Breaking News

पनवेल तालुक्यात दोघांचा मृत्यू; तर सात नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी
कामोठ्यात शनिवारी (दि. 9) कोरोनाचे दोन बळी गेले असून, महापालिका क्षेत्रात पाच नवीन रुग्ण आढळले. त्यात पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील मृतांची संख्या सात आणि रुग्णांची संख्या 143  झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये दोन नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्यात कोरोनाचे 190 रुग्ण झाले असून, मृतांची संख्या आठवर गेली आहे, जिल्ह्यातील रुग्णसंख्या एकूण 214वर पोहोचून बळींचा आकडा 10 झाला आहे. दरम्यान, तपासणी अहवालात तफावत आणि विलंब या कारणास्तव तुर्भेच्या थायरोकेअर लॅबोरेटरीला  महापालिका हद्दीत तपासणीला बंदी करण्यात आली आहे. एकल दुकाने सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.  
पनवेल महापालिका क्षेत्रात  कामोठ्यात शनिवारी दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय खारघरमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. कामोठे सेक्टर 34 मधील मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील 39 वर्षीय महिलेचा  मृत्यू झाला. सेक्टर 11  आशियाना कॉम्प्लेक्समधील 57 वर्षीय व्यक्ती कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होती. तिचाही मृत्यू झाला. कळंबोली सेक्टर 10 आयमधील रहिवाशी असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि खारघर सेक्टर 11 मधील फ्रेंड सोसायटीमध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोघेही चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कामोठे सेक्टर 18मध्ये राहणार्‍या आणि अंधेरी मरोळ येथील पोलीस हेड क्वार्टरमध्ये कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे. खारघर येथील सेक्टर 12 सूर्योदय सोसायटीमधील 43 वर्षीय महिला होम नर्सचे काम करते. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ती वांद्रे येथे काम करीत असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची बाधा झालेली होती. कामोठे सेक्टर 9 क्षीरसागर सोसायटीत राहणार्‍या व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत मानखुर्द शाखेत काम करणार्‍या 45 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील शनिवारपर्यंत 1388  जणांची कोरोना टेस्ट केली गेली. त्यापैकी 35 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. पॉझिटिव्हपैकी 87 जणांवर उपचार सुरू असून, 49 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर आतापर्यंत सात  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये शनिवारी दोन नवीन रुग्ण आढळले. उसर्ली खुर्द येथील नीळकंठ विश्व फेज-2मध्ये राहणार्‍या व मुंबईतील केआयएम हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या 36 वर्षीय महिलेला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. विचुंबे येथील ज्ञानेश्वर माऊली हौ. सोसायटीत राहणार्‍या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 47  रुग्णांपैकी सात बरे झाले आहेत.
दरम्यान, उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत 9 ते 12 मेपर्यंत कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जाणार आहे, तर 13 मेपासून किराणा, दूध आणि भाजीची दुकाने सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उघडी ठेवता येतील, असा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply