वनविभागाची मूक संमती
कर्जत : बातमीदार
नेरळ शहर व परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुळासकट झाडे तोडली जात आहेत. शहरातील खांडा भागात इमारती बांधण्यासाठी वनविभाग कार्यालयाच्याच बाजूची झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वनविभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत आहे. या जागेवर इमारती बांधण्यास नेरळ ग्रामपंचायतीने अद्याप परवानगी दिलेली नाही, तरीदेखील खोदकाम सुरू आहे. नेरळच्या खांडा भागात सर्व्हे नंबर 1/143, 1/144 या जागेवर इमारती बांधल्या जाणार आहेत. तेथे असलेली झाडे इमारत बांधण्यास अडथळा ठरत आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडे जागेच्या मालकाने झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती, मात्र ग्रामपंचायतीने वनविभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावीत, असे सूचित केले. या जागेपासून हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय असून त्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी हे दररोज चार वेळा ये-जा करीत असतात, पण वन विभागाच्या नाकावर टिच्चून त्या जागेतील 100 वर्षे जुनी झाडे कटर मशीन लावून तोडली जात आहेत. हे काम आठवडाभर सुरू असून, ते आणखी आठ-दहा दिवस चालणार आहे. या झाडांपासून वन विभागाचे कार्यालय जेमतेम 90 मीटर अंतरावर असूनदेखील ठेकेदार किंवा लाकूडतोड्यांना कोणतीही भीती वाटत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता त्या जागेचे मालक अल्ताफ मुजेद यांचा बांधकाम परवानगीसाठी अर्ज आला आहे, मात्र ग्रामपंचायतीने अद्याप त्या जागेवर बांधकाम परवानगी दिली नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे वनविभागाच्या संमतीने तेथे झाडे तोडली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
आमच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेतील झाडे ही इंजायली आहेत, त्यांचे वनविभागात महत्त्व नाही. त्यांनी आमच्या कार्यालयाकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. त्यांना परवानगी दिली असून, त्यासाठी कोणताही दंड आकारला नाही.
-नारायण राठोड, वन अधिकारी, नेरळ
आमच्याकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज आला आहे, पण आम्ही आधी वनविभागाची परवानगी घेऊन तेथील झाडे तोडावीत, असे सूचित केले आहे. त्यांना बांधकाम परवानगी दिली नाही, तरीदेखील तेथे खोदकाम सुरू केले असल्यास आमचे पथक त्या जागेवर जाऊन माहिती घेईल.
-संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी, नेरळ