कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरानमध्ये देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांविरुद्ध चळवळ उभी राहिली. त्यात आझाद दस्तासारखी देशप्रेमाने पेटून उठलेल्या तरुणांची फळी उभी करण्यात भाई कोतवाल यशस्वी ठरले. या आझाद दस्त्याचे यश इतके मजबूत होते की त्यांच्या चळवळीमुळे ब्रिटिशांना इनाम लावायची वेळ आली होती.त्या इनामासाठी प्रसंगी फितुरी झाली आणि भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना ब्रिटिशांच्या गोळ्यांपुढे आपला देह ठेवावा लागला. या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला 2 जानेवारी रोजी 76 वर्षे पूर्ण होत आहेत.
माथेरानमध्ये भाऊसाहेब राऊत यांनी सुरुवातीपासून गावातील देशप्रेमी तरुणांच्या पाठीशी आपली ताकद लावली होती. त्यामुळे महात्मा गांधी यांनी 1942ला ब्रिटिशांविरुद्ध चले जावची हाक देण्यासाठी मुंबईत गवालिया टँकवर देशप्रेमी नागरिकांना बोलाविले होते. त्यावेळी माथेरानमधील भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी तेथे उपस्थित होते. नंतर त्या सर्वांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी योजना आखण्याचा निर्णय घेतला. मुंबई ही ब्रिटिशांनी आपली आर्थिक राजधानी केली होती आणि मुंबईला वीजपुरवठा करणार्या काही मार्गिका कर्जत, अंबरनाथ तालुक्यातून जात होत्या. भिवपुरी येथील टाटा पॉवर स्टेशनमध्ये तयार झालेली वीज मुंबईला ज्या टॉवरच्या साह्याने जाते, ते विजेचे टॉवर म्हणजे त्या काळातील प्रचलित शब्द पायलन पाडले, तर मुंबईचा वीजपुरवठा खंडित होईल. त्यामुळे ब्रिटिशांना थोडा त्रास देता येईल अशी कल्पना भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यातील प्रमुख मानिवलीच्या गोमाजी पाटील यांना सुचली.
वागनी जवलिल डोने येथील पायलन 22 सप्टेंबर 1942 रोजी पाडण्याचा निर्णय झाला. आझाद दस्त्यामध्ये नेरल जवलिल मानिवली भागातील भगत मास्टर, मुंबई येथील रामलाल श्रीवास्तव, भास्कर तांबट, देशमुख अशी तरुण मंडळी आपल्या 20 ते 25 सहकारी यांच्यासह रात्रभर काहीतरी योजना राबवायचे आणि दिवसा भूमिगत होऊन योजना आखायचे. त्यात केवळ वीज वाहून नेणारे पायलन तोडण्याचे काम करीत असताना टेलीफोनच्या तारा तोडणे अशी कामेदेखील रात्री करायचे.त्यासाठी दिवसा जागा निश्चित करण्याचे काम काही ग्रामस्थ मदत म्हणून करायचे. अनेक लोक आझाद दस्त्यातील तरुणांना मदत म्हणून आर्थिक रसद आणि जेवण, भाजी भाकरी पुरावायचे.
पावसाचे दिवस असताना पायलन तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याने ब्रिटिश यंत्रणा हैराण झाली होती. त्यामुळे भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी यांची माहिती देण्यासाठी रोख इनाम लावले गेले. तरीही काही मदत मिळत नसल्याने अखेर ब्रिटिशांनी जी मंडळी आझाद दस्त्यामध्ये आहेत, त्यांच्या घरच्या मंडळींना मारहण करण्यास सुरुवात केली होती, तर काहींना पकडून नेण्यास सुरुवात केली होती. त्यात गोमाजी पाटील यांचे पुत्र हिराजी हेदेखील होते. हिराजीला पकडून नेरळ येथून कल्याण येथे नेण्यासाठी आणले. ब्रिटिश शिपायांच्या तावडीतून सुटका करून हिराजी भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यात सामील झाले. त्या वेळी त्यांचा मुक्काम मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या जंगल भागात होता. त्या मुक्कामी दूध आणि भाजी भाकरी घेऊन येणार्या एका आदिवासी व्यक्तीकड़े एक चिठ्ठी भाई कोतवाल यांनी बोरगाव येथील पाटील यांना देण्यासाठी दिली होती, मात्र ती चिठ्ठी त्या आदिवासीकडून घेऊन खंडू बोकड थेट ठाणे येथे पोहचला.
थोड्याशा पैशांच्या लोभापायी ब्रिटिश अधिकारी होंल पोलीस फौजफाटा घेऊन रात्रभर चालून सिद्धगड येथे पोहचला. त्यावेळी झोपेतून उठत असलेल्या आझाद दस्त्यावर चौफेर गोळीबार सुरू केला आणि अचानक झालेल्या गोळीबारात आझाद दस्त्याचे अधर्व्यू भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झाले. अन्य सहकारी यांना भाई कोतवाल यांनी गोळी लागताच तेथून पळून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अन्य लोक ब्रिटिशांना सापडले नाहीत, परंतु आपला 27 वर्षीय मुलगा गोळी लागून जखमी झालेला असताना त्यांना अखेरचा पाण्याचा थेंब पाजणे गोमाजी पाटील यांना जमले नव्हते. ब्रिटिशांच्या गोळीमुळे भास्कर तांबटदेखील जखमी झाले होते. त्यांना त्यानंतर चार दिवसांनी मरण आले.
भाई कोतवाल हे पेशाने वकील होते. त्यांनी आपली वकिली गरीब लोकांसाठी सुरू ठेवली होती. त्याआधी त्यांनी शेतकरी आणि गोरगरीब यांच्यासाठी 42 धान्यकोट्या सुरू केल्या होत्या. त्यांच्यापैकी काही आजही सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी शाळादेखील सुरू केल्या होत्या.
भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन्ही हुतात्मा यांचा बलिदान दिन प्रामुख्याने कर्जत आणि मुरबाड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कर्जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये या दिवशी सकाळी प्रभात फेरी काढून आणि हुतात्म्यांबद्दल माहिती देणारे कार्यक्रम कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित केले जातात.
-संतोष पेरणे, खबरबात