Breaking News

म्हसळ्यात माकडांचा उपद्रव; नागरिक त्रस्त

म्हसळा : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून म्हसळा शहर आणि  ग्रामीण भागामध्ये माकडांनी हैदोस घातला आहे. ही माकडे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे नागरिक विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत, मात्र या माकडांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या म्हसळा तालुक्यात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून तालुक्यात रानडुकरे, रानगवे, निलगाय, माकडे व वानरांनी रानात, शेतीत धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे नुकसान

केले आहे. पूर्वी साधारणपणे माकड, वानर या जाती सर्रास जंगलात आढळत असत, मात्र गेल्या काही वर्षांपासून म्हसळा शहरामध्येही माकडांनी हैदोस घातला आहे. शहरातील कन्या शाळा, विद्यानगरी, तांबट आळी, एकतानगर, ब्राह्मण आळी, वार्‍याचा कोंड, जैन कॉलनी, कुंभार वाडा, गोळवाडी, नवानगर या परिसरातील परसबागांमधील फळे व फुलझाडे, वाळत टाकलेल्या वस्तू यांचे नुकसान ही माकडे करीत आहेत. ब्लॉकचे स्लायडींग उघडून ही माकडे विविध जिन्नस पळवितात. बाजारपेठ परिसरात घुसखोरी करून त्यांनी किराणा व्यापार्‍यांचे गोडाऊन लक्ष्य केले आहे, मात्र या माकडांची तक्रार वनविभागाकडे करायची की  नगरपंचायतीकडे? ही समस्या निर्माण झाली आहे. माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी वन खात्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. वनखात्याने एकतर माकड पकड मोहीम राबवावी किंवा माकडांना जंगलात परतवण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी शेतकरी बागायतदारांकडून होऊ लागली आहे. मागील पाच वर्षांत (2014 -19) वन्य श्वापदे, वानर, माकडांनी म्हसळा तालुक्यात केलेल्या पीकनुकसानीसाठी शासनाने सहा लाख 37 हजार 955 रुपयांची नुकसानभरपाई शेतकर्‍यांना दिली. वन्य श्वापदांकडून पाळीव प्राण्यांवर (गाय, बैल, म्हैस) झालेल्या हल्ल्यामुळे दोन लाख 57 हजार 75 रुपयांची नुकसानभरपाई देण्यातआली आहे. मनुष्यहानीसाठी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले.

जंगली प्राणी का वळताहेत मानवी वस्तीकडे?

जंगलांना लागणारे वणवे आणि वृक्षतोड यामुळे माकडे जंगल सोडून मानव वस्तीकडे येत आहेत. पूर्वी जंगलांमध्ये आंबा, जांभूळ, कोकम, फणस आदी पशुपक्ष्यांचे खाद्य असलेली झाडे मुबलक प्रमाणात असत, मात्र वृक्षतोडीत ही झाडे राहिली नाहीत. सध्या वनखाते जंगलात आकेशिया, बाभूळ, निलगिरी यांसारखी जलद वाढणार्‍या झाडांची लागवड करते, मात्र ही झाडे वन्य प्राण्यांकरिता उपयोगाची नाहीत. त्यामुळे हे प्राणी आता मानवी वस्तीकडे वळले आहेत. हे विस्कळीत अन्नसाखळीचे सारे दुष्परिणाम आहेत.

ग्रामीण भागात कौलारू घरांची संख्या अधिक आहे. माकडे  उड्या मारून घरांची कौले, कोने मोठ्या प्रमाणावर फोडतात. हे नुकसान सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे हत्तींप्रमाणेच माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी वनखात्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

-वैशाली सावंत, माजी जि. प. सदस्य, म्हसळा

रानडुकरे, रानगवा, निलगाय, माकड, वानर व केलटानी रानात शेती, फळबागांना नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळते. शेतपिकाला कमान एक ते अडीच हजार रुपयांपर्यंत, फळपिकामध्ये नारळ रु. 4800, सुपारी रु. 2800, आंबा रु. 3600, केळी रु. 120, इतर फळझाडे रु. 500 (प्रतिझाड) याप्रमाणे नुकसानभरपाई मिळू शकते.

-निलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, म्हसळा

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply