Breaking News

पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा दिनांक 3 व 4 जानेवारी 2020 रोजी पनवेलमध्ये होणार आहे.
या अंतिम फेरीचे उद्घाटन 3 जानेवारीला सकाळी 9 वाजता होणार आहे, तर पारितोषिक वितरण समारंभ 4 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व निर्माता प्रसाद कांबळी, सन्माननीय अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, प्रदीप कब्रे, भरत सावले, सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वाणी पिल्लई, सुप्रसिद्ध निर्माती कल्पना कोठारी, दिग्दर्शक व अभिनेते दिनेश गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
नाट्य चळवळ वद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकिका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. या स्पर्धेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे ही स्पर्धा कोकण व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली तसेच बक्षिसांच्या रकमेतही भरघोस वाढ करण्यात आली.
दोन दिवस चालणार्‍या या स्पर्धेत पुणे व पनवेल केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या 20 एकांकिका सादर होणार आहेत. त्यामुळे या दर्जेदार स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याचा नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व सभागृह नेते परेश ठाकूर, प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्पर्धा सचिव डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी केले आहे.
अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक-एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक-50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना त्याचबरोबर प्राथमिक फेरीतील सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply