तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्ड्यांनी आता भयंकर रूप धारण केले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आदळत आपटत प्रवास करावा लागत असल्याचे दृश्य येथे रोजच दिसून येत आहे. अशातच यंदा झालेल्या विक्रमी मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने पार आणि प्रतापगडावर रविवारी नवरात्रोत्सवानिमित्त आश्विन शुध्द अष्टमीला देवीच्या दर्शनाला जाणार्या भक्तांच्या प्रवासावर दरडींची टांगती तलवार दिसून आली.
गेल्या वर्षी झालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या बसच्या अपघातामध्ये 30 जणांचा बळी गेल्यानंतर या घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आणि त्यासंदर्भात क्रॅश बॅरियर्स आणि संरक्षक भिंतीवजा बांधकामेदेखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली, मात्र यानंतर पावसाळ्यामध्ये विक्रमी पाऊस पडून घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी महाकाय दरडी कोसळल्या असून त्यासोबत मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून दरीमध्ये कोसळल्याचे दिसून येत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त आश्विन शुध्द अष्टमीला सातारा जिल्ह्यातील पार येथील श्रीरामवरदायिनी देवीच्या मंदिरामध्ये तसेच प्रतापगडावरील श्री भवानीमातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी देवीभक्तांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहनांची ये-जा आंबेनळी घाटामधून मोठ्या संख्येने दिसून आली आहे. या नवरात्रोत्सवामध्ये सातत्याने रेलचेल असताना दरडींचा त्रास जाणवत नसलेल्या प्रवासीवर्गाला अष्टमीला मात्र वाहनांची संख्या वाढल्याने त्रास सोसावा लागला. ज्या ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठाची बस कोसळली, त्या ठिकाणाहून काही अंतरावर कोसळलेल्या दरडी संपूर्ण रस्ता व्यापून दरीमध्येही मोठ्या प्रमाणात माती दगडांचे ढिगारे लोटल्याने अर्धाअधिक रस्ताच शिल्लक आहे. या ठिकाणी क्रॅश बॅरियरही तुटून अधांतरी लोंबकळत आहेत, तर काही ठिकाणी दरड कोसळण्यासाठी एकदा मुसळधार पाऊस होण्याचीच गरज आहे. एका ठिकाणी एक महाकाय दगड रस्त्यालगत येऊन स्थिरावला असून त्याखालील माती सरकल्यानंतर तो रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प करू शकणार आहे. अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडी अर्धवट असून त्या नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात घसरून रस्त्यावर येऊ शकतील अशी भीती निर्माण झाली आहे.
पोलादपूर ते महाबळेश्वर वाई सुरूर या नियोजित राष्ट्रीय महामार्गापैकी सध्या असलेल्या राज्यमार्गाचा सुमारे 22 किमी अंतराचा रस्ता पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे आहे. या राज्यमार्गाचे रूंदीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सुरुवातीला या राज्यमार्गावरील ब्रिटिशकालीन मोर्यावजा पूल हे काँक्रिटची कॉलर बसवून रूंदीकरण करण्यात आले. यानंतर लगतच्या डोंगराचा भाग कापण्यात येऊन रस्तेही रूंद करण्यात आले आहेत. यामुळे डोंगराचा भाग कापल्याने पावसासोबत मातीचे ढिगारे कोसळून रस्त्यावर येत वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. ज्या भागात हे भूस्खलन झाले तेथील रस्ताही कमकुवत असल्याचे तसेच डांबरी रस्त्याला भेगा पडू लागल्याचे दिसून येत आहे. साधारणत: 1880पासूनचा रस्ता पूर्णत: धोकादायक स्थितीत असल्याचे दिसते, मात्र या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन चौपदरीकरण करण्यात येणार असल्यामुळे संभाव्य धोक्यासह रस्त्याच्या सद्यस्थितीतील दुरवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.
-शैलेश पालकर, खबरबात