खोपोली : प्रतिनिधी
मुंबई – पुणे महामार्गावरील वावंढळ येथील धोकादायक पुलाची गुरूवारी (दि. 9) नॅशनल रोडवेज सोल्यूशनचे अभियंता धनंजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
सोमवारी सकाळी कापसाची पोती घेवून पनवेलकडे जाणारा ट्रक खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील पुलावरून ओढ्यात कोसळला होता. तो दोन दिवस तसाच पडून होता. बुधवारी पुलाखाली कोरड्या ओढ्यात गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी पोकलनने खोदकाम सुरू होते. त्यावेळी ठिणगी पडून कापसाच्या गोण्यांना आग लागली होती. ही आग गुरूवारपर्यंत धुमसत होती. दरम्यान, पुलाचे संरक्षक कठडे अद्याप दुरूस्त
झालेले नाहीत.
या महामार्गाची देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या नॅशनल रोडवेज सोल्यूशनचे अभियंता धनंजय शिंदे यांनी गुरूवारी या पुलाची पाहणी करून पुलाच्या परिसरात सावधान पट्टी तसेच सिग्नलची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
वावंढळ पुलावरील संरक्षक कठडे दुरूस्तीचे काम दोन दिवसात सुरू करण्यात येईल. बॅटरी उतरल्याने त्याठिकाणी बसविलेला सिग्नल बंद आहे. पुलाजवळील वळणावर वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील.
-धनंजय शिंदे, अभियंता, नॅशनल रोडवेज सोल्यूशन कंपनी