नवी मुंबई : प्रतिनिधी
ऑनलाइन शिक्षण सुरू झाले खरे, पण या पर्यायाने मुले मात्र ’डाऊन’ झाली आहेत. व्हिडीओ कॉलिंगद्वारे तासन्तास शिक्षण घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मोबाइल, टॅब अथवा लॅपटॉप याकडे मुले एकटक अथवा जवळून पाहतात. यामुळे डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, पुरेशी झोप न होणे, डोकेदुखीचा त्रास होणे अशा तक्रारी मुलांकडून केल्या जात आहे. लॉकडाऊननंतर मुलांमधील हे बदल पालकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. शिवाय भविष्यात पाठदुखी, कंबरदुखी, मान लचकणे अशा व्याधींचा त्रास होण्याची भीतीही पालकांना वाटत आहे. लॉकडाऊनपूर्वी पालक आम्ही मुलांच्या हातात मोबाइल देणे टाळत होतो, पण आता ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने मोबाइल हातात द्यावा लागतो. त्यानंतर बाहेर जाणे बंद असल्याने पालक स्वतः त्यांच्यासोबत खेळतात, पण घरकामात गुंतले की त्यांना मोबाइल हातळण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता त्याच्या दृष्टीबाबत पालकांना चिंता लागली आहे. रात्री उशिरा झोपणे अन् उशिरा उठणे असे बदलही जाणवत आहेत, तर ऑनलाइन शाळा सुरू असताना मुले खुर्चीवर व्यवस्थित बसत होती, पण दिवसभर मोबाइल हाताळताना त्यांच्या बसण्याची पद्धत पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे असे त्रास त्याला भविष्यात होतील, अशी भीतीदेखील पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ऑनलाइन शिक्षण घेण्याविना सध्या कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पालकांनी मुलांकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे, तसे न केल्यास त्यांच्या दृष्टीबाबत काही प्रश्न उद्भवू शकतात. याशिवाय पूर्वी पालक मुलांना फक्त अर्धा ते एक तसाच मोबाइल हाताळायला देत होते. आता मात्र बहुतांश वेळी मोबाइलचा ताबा मुलांकडे असल्याने त्यांच्याकडून इंटरनेटचा वापर हा अति होऊ लागला आहे. त्यात अनेक पालकांना झूम अॅप मिटिंगबाबत माहिती नसल्याने पालकांचादेखील गोंधळ उडतो. मग पालकांना मोबाइल घेऊन इतरांची मदत घ्यावी लागते. ऑनलाइन शिक्षण हे मुलासाठी जरी असले तरी त्याचा भार पालकांनाच उचलावा लागतो. एकंदरीतच स्क्रीन टाईम हा खूप अधिक होत आहे. तसे काही वाटल्यास वरचेवर डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. देशातून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत ऑनलाइन शिक्षण असेल. त्यामुळे मुलांना सुदृढ ठेवायचे असेल तर तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
आपला पाल्य कोणत्या वर्गात शिकतो व त्यासाठी सरकारने निर्धारित केलेली ऑनलाइन शिक्षणाची वेळ किती आहे हे जाणून घ्या. यामध्ये तफावत असल्यास हा मुद्दा शाळा व्यवस्थापनाच्याही लक्षात आणून द्या. मुख्य म्हणजे आपल्या पाल्याच्या डोळ्यांची काळजी घ्या.
-डॉ. प्रशांत भा. थोरात, नेत्ररोग तज्ञ तथा अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई
मोबाइल, टॅब अथवा लॅपटॉप मुलांपासून दीड ते दोन फूट अंतरावर ठेवा. दर 20 मिनिटांनी किमान 20 सेकंद थोडे दूरचे पहायला सांगा. पापण्यांची किमान 20 वेळा उघडझाप करायला सांगा. चष्मा लागलेला असल्यास त्याचा वापर करावाच. मुलांच्या बसण्याची पद्धत पालकांनी कटाक्षाने पहावी. -डॉ. राजश्री पाटील, वैद्यकीय अधिकारी, माथाडी हॉस्पिटल, कोपरखैरणे