ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे मत

अलिबाग : प्रतिनिधी
सध्याच्या शिक्षणात नैतिकता हा विषयच दिसत नाही. माणसे शिकत आहेत, परंतु सामाजाचे अध:पतन होत आहे. माणासांचा एकमेकांशी संवाद होत नसल्यामुळे माणूसपण धोक्यात आले आहे, असे मत सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी शनिवारी (दि. 9) येथे व्यक्त केले.
सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी चंदनशिव बोलत होते. उद्घाटन समारंभास एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, खासदार सुनील तटकरे, संमेलनाचे संयोजक अॅड. सतिश बोरुळकर, स्वागताध्यक्ष अॅड. प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित होते.
शेतकरी शेतात राबतो, कष्ट करतो, परंतु शहरातील माणसांना शेतकर्यांच्या वेदना दिसत नाहीत. शेतकर्यामुळेच मराठी साहित्याला मातीचा सुगंध मिळाला आहे. तो सुगंध जपून ठेवण्याचे काम शेतकरी साहित्यिकांनी करावे, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले; तर शेतकरी ज्या परिस्थितीत आपली हयात घालवतात, त्याकडे कुणी व्यथा म्हणून पाहत नाहीत, अशी खंत राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, सकाळी अलिबाग शहरातील शिवाजी चौकातून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.