खोपोली : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत मधूनमधून पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडूनही मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खालापूर, खोपोलीत मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नाकाकामगारांची मागणी वाढल्याने खोपोलीत सध्या नाकाकामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.कमीतकमी पाचशे रुपये हजेरी प्रमाणे खोपोलीत नाकाकामगार उपलब्ध होत आहेत. मान्सूनपूर्व कामांत नगर परिषदेकडून गटारे व नाले सफाई मोहीम सुरू आहे. शेतकर्यांकडून शेतीच्या मशागतची कामे, बांधकाम क्षेत्राकडून सिमेंटसह इतर किमती साहित्य ठेवण्यासाठी तात्पुरते छत निर्माण करण्याची लगबग सुरू आहे. वीटभट्टीवाल्यांकडून ताडपत्रीचे आछादन बनविण्याची कामे, सर्वसामान्य नागरिकांकडून घरांच्या छतांची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. विविध सरकारी यंत्रणाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूला चर काढणे, महावितरणकडून वीज वाहिन्यांना अडथळा निर्माण करणार्या झाडांच्या फांद्या काढणे, मोठी झाडे छाटणे, वीज वाहिन्यांची देखभाल करुन घेणे अशी सर्व कामे सुरू आहेत. दुसरीकडे महिला वर्गाकडूनही घरगुती आवश्यक साहित्य खरेदीसह अन्नधान्य, मसाला व डाळीचा गरजेएवढा साठा केला जात आहे.
खोपोली शहरातील नालेसफाई व गटारे स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मान्सूनपूर्वीची अन्य कामे व डागडुजीची कामेही वेगाने सुरू आहेत.
-सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली
पावसाळी हंगामात अन्नधान्य, कडधान्ये, डाळी, कांदे व लसूण आदि आवश्यक वस्तुंचे बाजारभाव वाढतात.तसेच चांगल्या वस्तू मिळतील याची खात्री नसते, म्हणून पावसाळी हंगामात पुरेल एवढा आवश्यक साठा करण्याची पारंपरिक पद्धत आहे.
-सीमा सेलूकर, गृहिणी, खोपोली