अलिबाग : प्रतिनिधी
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार
(दि. 3)पासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात 71 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 40 हजार 39 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. केंद्राच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. छुपे कॅमेरे व अन्य संपर्क साधने विद्यार्थ्यांना व इतर कोणालाही परीक्षा केंद्रावर नेण्यास बंदी आहे. परीक्षेच्या कालावधीत जिल्हा स्तरावर एकूण सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
परीक्षेच्या वेळी गैरप्रकार आढळल्यास त्या विद्यार्थ्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे, तसेच संबंधित केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांना प्रशासकीय कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
नागोठणे केंद्रात 545 विद्यार्थी
नागोठणे : प्रतिनिधी दहावीच्या वार्षिक परीक्षेस मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. कोएसोच्या नागोठणे येथील श्रीमती गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर केंद्रात 545 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये अग्रवाल विद्यामंदिरसह उर्दू हायस्कूल, होली एंजल, परमार हायस्कूल, वरप येथील रानपाखरं, रिलायन्सचे अंबानी फाऊंडेशन, पळस येथील पीएनपी हायस्कूल, पिगोंडे येथील तटकरे हायस्कूल, शिहू हायस्कूल, वांगणी हायस्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रसंचालक विश्वनाथ म्हात्रे आणि मुख्याध्यापक केशव जांभळे यांनी दिली.