आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, डे केअर सेंटर येथील जैव वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजा या कंपनीचे वाढीव दर कमी करण्याबाबत व इतर तक्रारींचे निवारण करण्याबाबत रायगड मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची गुरुवारी (दि. 22) महापालिकेच्या मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीस महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, महापालिका कार्यक्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेस जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जैव वैद्यकीय कचरा अधिनियम 2016 अंतर्गत जिल्हास्तरीय गठीत असलेल्या समितीस बैठक घेण्याकरिता जिल्हाधिकार्यांना निवेदन पत्र देण्याबाबत सूचित केले.
आयुक्त मंगेश चितळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास जैव वैद्यकीय कचर्याबाबतचे शासन निर्णय व नियमावली देण्याबाबत सूचित केले तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित असलेल्या समितीची सचिव या नात्याने लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याबाबत सूचित केले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, डे केअर सेंटर येथे जैव वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजा या खासगी कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्राधिकृत केले आहे, परंतु जैव वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता महापालिका कार्यक्षेत्रात ही एकमेव कंपनी असल्याकारणाने कंपनीचा कारभार मनमानी पद्धतीने चालू आहे, असे खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब डे केअर सेंटर यांचे म्हणणे आहे. जैव वैद्यकीय कचर्याची योग्य व वेळेत विल्हेवाट लावणे परिसराच्या, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने रायगड मेडिकल असोसिएशनने पत्राद्वारे आमदारमहोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत व आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली खासगी रुग्णालय प्रतिनिधी व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजा यांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची एकत्रित बैठक आयोजित करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक झाली.
या वेळी चर्चेदरम्यान ठाणे महापालिकेच्या दरांप्रमाणे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, डे केअर सेंटर्सना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि. कंपनीने दर आकारण्याबाबत स्वीकृती दर्शविली.