Breaking News

कर्जतजवळ रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक एक तास ठप्प

कर्जत : बातमीदार

कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वेस्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सोमवारी

(दि. 2) सकाळी सव्वानऊ ते 10 या वेळेत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवासी वाहतूक  ठप्प झाली होती.

खोपोली येथून मुंबई सीएसएमटीला जाणार्‍या लोकलने सोमवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी कर्जत स्टेशन सोडले, मात्र त्याआधी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ही गाडी गेल्यानंतर कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या सावरगाव रेल्वे फाटकाच्या गेटमनला रुळाला तडे गेले असल्याचे जाणवले. त्याने प्रसंगावधान दाखवून त्याबाबतची माहिती कर्जत रेल्वेस्थानकात दिली. त्यामुळे  कर्जत स्थानकातून सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी सुटलेली लोकल सावधरीत्या भिवपुरी रोड स्थानकाकडे जात होती. त्या लोकलमधून आलेल्या कामगारांनी तडे गेलेला रूळ बदलण्याचे काम केले. तोपर्यंत थांबून राहिलेली लोकल 10 वाजून दोन मिनिटांनी मुंबई सीएसएमटीकडे रवाना झाली.

 या कालावधीत कर्जत-मुंबई मार्गावर एकही एक्स्प्रेस गाडी जाणारी नसल्याने त्याचा कोणताही परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला नाही. त्याचवेळी केवळ कर्जत येथून 9.47ला

मुंबईकरिता सुटणारी लोकल 15 मिनिटे उशिरा कर्जत येथून सोडण्यात आली, तसेच कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस हीदेखील 20 मिनिटे उशिराने मुंबईकरिता कर्जत स्थानकातून रवाना झाली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply