![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/03/muktai-mahila-bhajan-1024x686.jpg)
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील मुक्ताबाई महिला भजन मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गरीब महिलांचा सत्कार, महिलांसाठी सहलीचे आयोजन, हळदी-कुंकू आदी कार्यक्रमांचा समावेश होता. 2015 साली नवीन पनवेल सेक्टर 10 येथील काही महिला एकत्र येऊन त्यांनी मुक्ताबाई महिला भजन मंडळाची स्थापना केली. यावर्षी मंडळाला पाच वर्षे पूर्ण झाली. तसेच हे मंडळ संपूर्ण वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवित असते. यामध्ये विविध सामाजिक कार्य, वृद्धाश्रमाला भेटवस्तू, धान्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप असे विविध उपक्रम हे मंडळ राबवित असते. समाजात चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी चांगले विचार समाजात रुजवणे गरजेचे असते. महिलांसाठीच कार्य मर्यादित न ठेवता संपूर्ण समाजासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने हे महिला मंडळ कार्यरत आहे. महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला महिलांना सल्लागार व मार्गदर्शक म्हणून माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशिला घरत होत्या. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा अनिता भोईर, सचिव साधना गडदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होेत्या.