नगरसेविका दर्शना भोईर यांची आयुक्तांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना व्हायरसच्या साथीबाबत प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व सोसायट्यांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक रुग्ण सापडलेले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे परिसरातही कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळला असून, महानगरपालिका हद्दीतील इतर नागरिकांना त्याची लागण होऊ नये याकरिता महानगरपालिका हद्दीत जे नागरिक इतर देशातून आले असतील अशा नागरिकांची माहिती महानगरपालिकेस तातडीने देण्याबाबत महानगरपालिकेद्वारे सर्व सोसायट्यांना सूचना देण्यात यावी. जेणेकरुन अशा नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करणे शक्य होईल व या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल. तसेच कोरोना व्हायरसची लागण महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना होऊ नये, याकरिता बाहेरील नागरिकांची माहिती तातडीने देणेबाबत सर्व सोसायट्यांना सूचना देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका दर्शना भोईर यांनी आयुक्तांना दिले आहे.