मोहोपाडा : प्रतिनिधी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ख्यातनाम आहेत, लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी आपले आयुष्य वेचले असे उद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रसाद चाफेकर (सातारा) यांनी काढले. चौक येथील लोकमान्य टिळक वाचनालयातर्फे साहित्यप्रेमी रसिकांसाठी आयोजित केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्म चरित्रावरील व्याख्यान मालिकेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध डॉ. श्रीधर वाळिंबे हे होते. ते पुढे म्हणाले, भारतीय क्रांतिकारक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार व भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक तर भारतीय त्यांना लोकमान्य म्हणत. त्यांनी शेतकरी संघटित करण्याचे काम केले. धार्मिक सलोख्याचे व एकोपा वाढविण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. मुस्लिम समाजाला स्वातंत्र्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा आग्रह होता. वेगवेगळ्या परदेशी राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला ते गणिताचे प्राध्यापक होते. केसरी व मराठा या वृत्तपत्राचे ते संपादक होते. मानवतेची पूजा करण्यास शिकले पाहिजे ही त्यांची भावना होती, तर शिक्षणासाठी शाळा व कॉलेजची स्थापना केली. 1897 साली त्यांना कैदेची सजा झाली तेव्हा आपल्या बचावासाठी त्यांनी चार दिवस 21 तास न्यायालयात बाजू मांडली. कार्यक्रमास डॉ. बालीगा, कृष्णा चंबावडे, पूनम चोगले, ऐश्वर्या जोशी, स्नेहल महिला मंडळच्या सदस्या, अनेक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत चौधरी, गणेश कदम, सतीश आंबवणे व वाचनालय सदस्य यांनी मेहनत घेतली.