नवी मुंबई : बातमीदार
गणेश चतुर्थीला वाजत गाजत झालेल्या आगमनानंतर बाप्पाला व माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यात आला. बाप्पांना व गौरींना दुपारपासूनच निरोप देण्यास सुरुवात झाली. या वेळी पालिकेचे मंडप नवी मुंबईतील प्रत्येक तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ सजलेले दिसले तसेच या मंडपात स्वयंसेवक, पालिकेचे अधिकारी व पोलीस देखील सज्ज होते. तलावात बाप्पांना अलगद डोक्यावर व कबेत घेऊन जाणारे स्वयंसेवक लाईफगार्ड जॅकेट घालून तयार होते. अनेक बाप्पांना अलगद या स्वयंसेवकांनी निरोप दिला. वाजत गाजत मिरवणूक काढण्यास परवानगी नसल्याने शांततेत विसर्जन केले गेले. नवी मुंबईत अनेक गावांतून डोक्यावर गणेशाची मूर्ती घेऊन विसर्जन तलाव गाठला जातो. त्यानुसार विसर्जन तलाव व परिसरातील कृत्रिम तलाव अनेकजण गाठताना दिसले. पालिकेच्या आवाहनाला नागरिक साथ देताना दिसले. त्यानुसार मास्क घालून, नागरिक येत होते.
यावेळी घरगुती गौरी गणपती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसार्जन करण्यात आले. अनेक जणांनी यंदा फटाके वाजवणे टाळत पर्यवर्णाच्या रक्षणात भर टाकली. तर बाप्पासोबत आणलेले निर्माल्य टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कलशात टाकण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या स्वच्छतेच्या आवाहनाला नागरिक साथ देताना दिसले. कोविडमुळे पालिकेचे नैसर्गिक तलाव न गाठता कृत्रिम तलाव गाठत विसर्जन करण्यात आले. यावेळी या अनेकजण स्वछता राखत वारंवार सॅनिटायजरचा वापर करताना पाहायला मिळाले.
कृत्रिम तलावांना प्रतिसाद
नवी मुंबईतील अनेक स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्षांकडून गर्दी टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन व कृत्रिम तलावांपर्यंत नेण्याची तजवीज करण्यात आली होती. तशी नोंदणी दोन दिवस आधीच अनेक घरांतुन केल्या गेल्या होत्या. कोविड संकटकाळात या उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले. वाशीत विसर्जन तलाव आपल्या दारी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.