Breaking News

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर निकल जाए या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा किस्सा…
हे गाणे लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोरकुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचे होते. पडद्यावर हे गाणे एका हिल स्टेशनवर राखी व ऋषी कपूर यांच्यावर सुरु होते आणि मग राखीच्या फ्लॅशबॅकमध्ये शशी कपूर हे गाणे गातो. शशी कपूरला मोहम्मद रफींचा आवाज आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस मोहम्मद रफी काही कारणास्तव उपस्थित नव्हते. त्यांचा ट्रॅक दहा दिवसांनी ध्वनिमुद्रित करायचे ठरले. लता मंगेशकर व किशोरकुमार यांनी गायलेल्या भागाची ध्वनीफित मोहम्मद रफींकडे द्यावी म्हणजे त्यांना कल्पना येईल की गाणे कसे आहे, गाण्याचा मूड कसा आहे, पण मोहम्मद रफी यांनी ध्वनिफीत नाकारली. राजेश रोशनना प्रश्न पडला आता गाणे वेळेवर ध्वनिमुद्रित कसे होणार? रफीसाहेबांच्या गुणवत्तेबद्दल पूर्ण विश्वास आहे, पण तरीही या गाण्याची त्यांना कल्पना असलेली बरी. अशातच रेकॉर्डिंगला अवघा एक दिवस असतानाच मोहम्मद रफी यांनी हे गाणे समजून घेतले आणि दुसर्‍याच दिवशी रेकॉर्डिंगच्या वेळेस जरासे कुठे न थांबता, न अडखळता ते गायले. त्यामुळेच फर्स्ट टेक ओके झाला. या गोष्टीतून मोहम्मद रफी यांचे मोठेपण दिसून येते.
राकेश रोशन निर्मित व दिग्दर्शित कहो ना प्यार है (2000)च्या निमित्ताने जुहूच्या सनी सुपर साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओत राजेश रोशनच्या मुलाखतीचा योग आला असता त्यानेच ही गोष्ट मला सांगितली.
राजेश रोशनने संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट मेहमूद दिग्दर्शित कुंवारा बाप (मुंबईत रिलीज 29 नोव्हेंबर 1974)च्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण झाली. याचाच अर्थ त्याच्याही चौफेर कारकिर्दीला यशस्वी पन्नास वर्ष पूर्ण.
मेहमूदच्या काही वैशिष्ट्यांतील एक म्हणजे, त्याने दोघांना स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून आपण निर्माता असलेल्या चित्रपटात संधी दिली आणि दोघेही संगीतकार पुत्र हा योगायोग. सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मनला एम.एस. अकबर दिग्दर्शित छोटे नवाब (1961)च्या वेळेस, तर संगीतकार रोशन यांचा पुत्र राजेश रोशनला ‘कुंवारा बाप’च्या वेळेस पहिली संधी दिली. दोघांनीही आपल्या गुणवत्ता, आत्मविश्वास, मेहनत व व्यावसायिकता या गुणांवर स्वतःचे स्थान व ओळख निर्माण केली.
राजेश रोशनने पहिलाच चित्रपट कुंवारा बापमध्ये प्रसंगानुरूप हिजड्यांचे गाणे दिले. मोहम्मद रफी, मेहमूद आणि कोरसने गायलेल्या सज रही गली हे गाणे शहरापासून ग्रामीण भागात लाऊडस्पीकरवर जणू धुमाकूळ घालण्यात यशस्वी ठरले. पारंपरिक चित्रपट संगीतावर प्रेम करणारे या गाण्याने दुखावले. तरी चित्रपटात ते फिट्ट बसले. कुंवारा बापमधील किशोरकुमारच्या आवाजातील मै हू घोडा यह है गाडी…देखील लोकप्रिय. विशेष म्हणजे चित्रपटाची सुरुवात आणि श्रेयनामावली या गाण्यापासून सुरू होते.
राजेश रोशनने पुढच्याच चित्रपट ज्युली मध्ये प्रीती सागरच्या आवाजात माय हार्ड इज बिटीन असे इंग्लिश गाणे दिले. पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा. या चित्रपटातील दिल क्या करे कब किसीको (किशोरकुमार), भूल गया सबकुछ… (किशोरकुमार व लता मंगेशकर)देखील लोकप्रिय.
आपल्या पित्याचा अर्थात रोशन यांच्या चित्रपटांचा काळ वेगळा होता आणि आपण चित्रपटसृष्टीत आलो आहोत तो काळ पूर्णपणे वेगळा असल्याचे भान त्याने ठेवले.
अमिताभ बच्चनच्या सूडनायक (अ‍ॅन्ग्री यंग मॅन) वादळाचे ते दिवस होते. ढिश्यूम ढिश्यूमने पिक्चर व्यापला होता. युवा पिढीचा तो हीरो होता. अशातच राजेश रोशनने मिस्टर नटवरलाल चित्रपटासाठी त्याच्याकडून मेरे पास आओ मेरे दोस्तो हे बाल प्रेक्षकांसाठी गाऊन घेतलेले गाणे असे काही लोकप्रिय झाले की अमिताभ चिल्लर पार्टीत अर्थात बच्चेकंपनीतही लोकप्रिय झाला आणि त्याचा पार्श्वगायक म्हणूनही उगम झाला आणि त्याने त्यानंतर अनेक गाणी गायली.
खुद्द राजेश रोशनही गायलाय याची तुम्हाला कल्पना आहे? दो और दो पांच चित्रपटातील इन्हे अभी देखा नही हे किशोरकुमारने गायलेले गाणे चित्रपटात अमिताभ बच्चन साकार करतो. त्यानंतर तेच गाणे फनी स्वरुपात शशी कपूरवरही आहे. ते राजेश रोशन मजेत गायलाय.
यश चोप्रा दिग्दर्शित त्रिशलचे संगीत आपल्याला मिळावे अशी असलेली त्याची अपेक्षा यशजींनी नाकारून खय्याम यांना संधी दिली व काला पत्थर राजेश रोशनला दिला, पण त्याची दोन गाणी यशजींना न आवडल्याने त्यांनी त्याच्याऐवजी दुसरे कोणी संगीतकार घ्यावे असा विचार केला असता ती गोष्ट लता मंगेशकर यांना माहीत पडली आणि त्यांनी तसे होऊ दिले नाही.
राजेश रोशन चित्रपटसृष्टीत आला तेव्हा जुन्या पिढीतील सचिन देव बर्मन, मदन मोहन, नौशाद, सलिल चौधरी, जयदेव, खय्याम, सोनिक ओमी कमी अधिक प्रमाणात कार्यरत होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राहुल देव बर्मन, उषा खन्ना जबरदस्त फॉर्मात होते. सपन जगमोहन, सपन चक्रवर्ती कार्यरत होते. रवींद्र जैन, भप्पी लाहिरीचे आगमन झाले होते. तात्पर्य राजेश रोशनला स्वतःला सिद्ध करण्यात आव्हान होते. अशा वेळी काही वेगळे करणे आवश्यक होते. त्याचे त्याने भान ठेवले.
राजेश रोशनची माझी अतिशय आवडती गाणी अनेक आप कहे और हम ना आये (देस परदेस), कां करू सजनी आये ना बालम (स्वामी), दिल क्या करे कब किसीसे (ज्युली) कहो ना… प्यार है हां तुमसे प्यार है (कहो ना प्यार है), ओ मुंगळा मै गुड की (इन्कार), कोई रोको ना दीवाने को (प्रियतमा), सज रही गली मै (कुंवारा बाप), तेरी जिंदगी की रागिणी पर (जाग उठा इन्सान), दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है (आखिर क्यू), थोडा है थोडे की जरुरत है (खट्टा मिठ्ठा), एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर), सारा जमाना हसिनों का दीवाना ( याराना), तुझ संग प्रीत ( कामचोर), यह जीना है अंगूर का दाना (खट्टा मिठ्ठा), पलभर मे ये क्या हो गया (स्वामी), मै अकेला अपनी धुन मे मगन (मनपसंत), कोई मिल गया (कोई मिल गया). नजराना भेजा किसीने प्यार का (देस परदेस). लोगों का दिल अगर जितना है तो (मनपसंत), छूकर मेरे मनको तुने क्या इशारा (याराना).
राजेश रोशनची आणखी अनेक गाणी त्याच्या विविधतेचा सकारात्मक प्रत्यय देतेय. त्याच्यावरही उचलेगिरीचा (कॉपीचा) आरोप झाला. जुर्ममधील जब कोई बात बिघड जाए, क्या कहना चित्रपटातील ये दिल लाया है बहार ही गाणे एका विदेशी चित्रपटातील ट्यूनवर आधारित असल्याचे म्हटले गेले. सत्तर-ऐंशीच्या दशकात विदेशी ध्वनिफीतीवरून हिंदी चित्रपट संगीत याचे प्रमाण वाढत होतेच. त्यात राजेश रोशन अपवाद कसा ठरेल? तरीही त्या वाटेला तो जास्त गेला नाही.
आपला सहा वर्षांनी मोठा असलेला भाऊ राकेश रोशन निर्मित व दिग्दर्शित चित्रपटांना सातत्याने संगीत देण्यात त्याने विशेष रस घेतला. विशेषत: ’कहो ना प्यार है’ (2000)पासूनच्या वाटचालीत (तीदेखील पंचवीस वर्षांची होतेय) त्याने कुटुंबातील चित्रपट संगीतबद्ध करण्यावर जास्त भर दिला. उगाच चित्रपटांची संख्या वाढवणे, सतत आपल्याच चित्रपटासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओचे बुकिंग कायम ठेवणे असे त्याने काहीच केले नाही (त्यापेक्षा आपले खासगी आयुष्य आणि आवडती झोप यांना प्राधान्य दिले.) आपल्या भावाशी मात्र त्याचे एकेका चालीवरून वाद घालत घालत गाणे रेकॉर्ड होत राहिले. अनेकदा त्याला आपल्या भावाचेच ऐकावे लागते. (मागील पंचवीस वर्षांत राजेश रोशनने फक्त पंधरा चित्रपटांना संगीत दिले.)
राजेश रोशनची संगीतकार म्हणून पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल अनेक सकारात्मक गोष्टींची. त्याचे कौतुक हवेच. चित्रपटांच्या संख्येच्या गर्दीत हरवून न जाता आपल्या गतीने, शैलीने राजेश रोशन येथपर्यंत आलाय, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! त्याची ही वाटचाल त्याच्याच एका लोकप्रिय गाण्यासारखी, मै अकेला अपनी धून मे मगन जिंदगी का मजा लिये जा रहा था…
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply