नागोठणे : प्रतिनिधी : येथील किराणा, मेडिकल तसेच दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (दि. 23) आपले व्यवसाय चालू केले होते, मात्र सकाळी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात करून अनेकांचे दरवाजे बंद केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्याची घोषणा करण्यात आली असल्याची करताना राज्यात 144 कलम लावल्याचे जाहीर केले होते, मात्र नागोठण्यातील काही नागरिकांसह 31 मार्चपर्यंत बंदी घातलेल्या अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सकाळपासून चालू केले होते. याबाबत लक्ष वेधल्यावर पोलिसांनी धडक कारवाईला प्रारंभ करून त्यांना व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले.
याबाबत बोलताना विशेष पोलीस शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्यांवर यापुढे आम्ही कारवाई करणार आहोत. इमारतीचे बांधकाम करणार्यांनासुद्धा सध्या बंदी असून असे काम चालू असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे.
दरम्यान, संपूर्ण नागोठणे शहरात औषधांची फवारणी करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ सोमवार दुपारपासून करण्यात आला असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या दोन तरुणांना पाच दिवसांपूर्वी येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. एका तरुणाला दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरी सोडण्यात आले होते. आज दुसर्या तरुणालासुद्धा घरी सोडण्यात आले आहे. या दोघांवर कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्याने त्यांना सोडण्यात आले असले, तरी 31 मार्चपर्यंत त्यांना त्यांच्या घरातून बाहेर येण्यास बंदीच असून त्या ठिकाणी नेमलेल्या पोलीस अथवा इतर सरकारी कर्मचार्याचे त्यांच्यावर 24 तास लक्ष असेल असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
शहरात सलग दुसर्या दिवशी तीन व सहा आसनी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथील रिलायन्स कंपनी चालूच होती व सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेकेदारांच्या कामगारांची गर्दी असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नसल्याने कंपनीची नक्की भूमिका काय आहे हे समजू शकले नाही.
येथील रेल्वेस्थानकात रविवारपासून मत्स्यगंधा एक्स्प्रेस उभी आहे. याबाबत येथील रेल्वेच्या कार्यालयात विचारणा केली असता, लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये रेल्वेगाड्या उभी करण्यास जागा उपलब्ध नसल्याने ही रिकामी गाडी कुर्ला, मुंबई येथून रविवारी येथील स्थानकात पाठविण्यात आली आहे व अशाच दोन गाड्या रोहे स्थानकात पाठविल्या असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.