Tuesday , February 7 2023

मंत्री राठोडांवर कारवाई का नाही?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मुंबई ः प्रतिनिधी

तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले व लपून बसलेले राज्य सरकारमधील एक मंत्री आता 15 दिवसांनंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिद्धिमाध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. एका वृत्तवाहिनीवर त्या मंत्र्याचे आत्महत्या केलेल्या तरुणीसोबतचे फोटोही प्रसिद्ध झालेत. मग अद्यापही या मंत्र्याविरुद्ध ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी पोहरादेवीत दर्शनासाठी पोहचले होते. राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर नाव न घेताच चंद्रकांत पाटील यांनी राठोड यांच्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

त्या मंत्र्याविरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणे बाकी आहे, राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे, राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही, असे प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा ठाकरे सरकारने ओलांडल्याची टीका करतानाच पाटील यांनी ‘या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का,’ असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षित असताना ते त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका आरोपीला वाचवत असल्याचा आरोप करतानाच पाटील यांनी जोपर्यंत त्या तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका जाहीर करून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply