38 कर्मचार्यांना शिस्तभंगाची नोटीस
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेने खोट्या हजेरी लावणार्या सफाई कामगाराला निलंबित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामात हलगर्जीपणा करणार्या 14 कंत्राटी कर्मचारी, चार वाहन चालक आणि 20 शिक्षक कर्मचार्यांना शिस्तभंगाच्या नोटीसा दिल्या असून अजून काही अनुपस्थितांना त्यांच्या विभागातून माहिती घेऊन शिस्तभंगाची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू
असल्याचे समजते
पनवेल महापालिकेचे सफाई कामगार दिवेश देवानंद सावंत यांचेकडे मे. साई गणेश एन्टरप्रायजेस, या सफाई ठेकेदार कंपनीच्या प्रभाग 16 नवीन पनवेलमधील सफाई कामगारांवर देखरेख करण्याचे काम देण्यात आले होते. त्यांने ठेकेदार कंपनीकडील अस्थाई कामगार नितीन ठाकूर याचेशी संगनमत करून सफाई कामगारांच्या खोट्या हजेरी लावून पैसे घेण्याचा प्रकार उघडकीस आल्याने ठेकेदार कंपनीने संबंधित प्रकार महापालिकेच्या लक्षात आणून दिल्याने महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी त्याला
निलंबित केले आहे.
लोकसेवा करण्यासाठी नोकरी आहे. त्यामुळे कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे असताना साथ रोग अधिनियम 1897 मधील नियमावलीचे उल्लंघन करून 14 कंत्राटी कर्मचारी, चार वाहन चालक आणि 20 शिक्षक विना परवाना गैरहजर राहिल्या बद्दल त्यांना शिस्तभंगाच्या नोटीसा दिल्या असून याशिवाय महापालिकेच्या इतर विभागातील अनुपस्थितांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती
आयुक्तांनी दिली आहे.