पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्ताने खारघर ओवे सेक्टर 19 येथील मैदानावर आयोजित दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाला शनिवारी (दि.28) प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहत गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. विविध समाज, पंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडवले. सकाळपासून गुरूबाणी, कीर्तन, पाठ, धार्मिक प्रवचन, आरोग्य शिबिर, शस्त्रास्त्र प्रदर्शन, महिलांचे पारंपरिक नृत्या आदींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपमहापौर प्रमिला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंझारराव, स्वप्नील ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी लाखो भाविक उपस्थित होते. गुरुद्वाराच्या परंपरेनुसार लंगर सेवेचेही आयोजन करण्यात आले असून हजारो स्वयंसेवकांनी सेवा कार्यात सहभाग घेतला आहे.
या समागमात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीयम, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समागमात सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकता, बंधूता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धा, सेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरू ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा समागम केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
दरम्यान, भव्य समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यसेवा, स्वच्छता व पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
Check Also
वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात तारांकित प्रश्न
प्रदूषण करणार्यांवर कारवाई- मंत्री पंकजा मुंडे पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शहरांमधील वायू प्रदूषणाबाबत आमदार …
RamPrahar – The Panvel Daily Paper