Breaking News

गुरू तेग बहादुर यांच्या त्यागात देश सदैव ऋणी -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंद दी चादर म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे सर्व समाजासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागात सदैव ऋणी आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 1) खारघर येथे काढले.
अल्पसंख्याक विकास आणि राज्य सर्वसमागम विभाग यांच्या वतीने खारघर येथे गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्त दोन दिवस विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास दुसर्‍या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती लाभली. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, प्रत्येक गुरूद्वारा आणि वस्तीपर्यंत ‘हिंद दी चादर’चा संदेश पोहचविण्यासाठी बाबा हरनाम सिंगजी यांनी मोठे कार्य केले आहे. राज्य शासनाने यापूर्वी नांदेड व नागपूर येथे आयोजित केलेल्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवी मुंबईतील कार्यक्रमात शीख बांधवांसह विविध समाजघटकांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शहादतीचा विशेष उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले की, अन्याय आणि अत्याचारांविरोधात उभे राहून त्यांनी दिलेले शहिदत्व भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. शीश दिया, पर सिर न झुकाया हीच शीख गुरू परंपरेची ओळख असून भारताच्या अखंडतेचा तो आधार आहे.
यावेळी शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंग, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शाह यांचा जफरनामा देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती पुढील पिढीपर्यंत पोहचली जावी. यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे तसेच नवी मुंबई परिसरात त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मानवतेचे रक्षक आणि महान त्यागी गुरू तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण पर्व आहे. त्यांचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती, परंपरेच रक्षण करण्यासाठी गुरूंनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे कार्य अतूट श्रद्धा आणि अतूट धैर्याचे उदाहरण आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमादरम्यान स्वतः लंगरमध्ये संत-महंताना भोजन वाढून सेवा दिली. सेवा हीच खरी श्रद्धा या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.

गुरूंच्या शौर्याची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहचवणे हीच खरी सेवा -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला.
गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरू गोविंद सिंह आणि गुरू नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून झाली. त्यानंतर नांदेडमधील तख्त हजूर साहिब येथे कार्यक्रम झाला आणि आता नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचला. या उपक्रमाद्वारे गुरू तेग बहादूर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहचविण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी शासनाचे अभिनंदन केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply