मुंबई : प्रतिनिधी
मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टँड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले की, कोविड-19संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत ते म्हणजे रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश व मालेगाव महापालिका हा एक आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. याशिवाय कोविड-19 लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात कंटेन्मेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार केले आहेत. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत देताना ती दुकाने कंटेन्मेंट झोनमध्ये नसतील. यात मद्याच्या दुकानांना हाच नियम लागू असेल. एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत अशी दुकाने. कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करेल. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.
नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. ज्या रेड झोन भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी कामगारांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय बंधनकारक आहे.
कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, केंद्र शासनाने राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिका हद्द, पुणे महानगर प्रदेशातील सर्व महापालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेड झोनमध्ये केला आहे. केंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत, मात्र मुंबई व पुणे प्रदेशात कोरोनाचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नसल्याने तेथील सवलतींवर मर्यादा घालाव्या लागत आहेत. मुंबई प्रदेशातील महापालिका (एमएमआर रिजन), पुणे, पिंपरी-चिंचवड व मालेगाव महापालिका हद्दी या रेड झोनमध्ये येत असून, येथील उद्योग सुरू करण्यास अद्याप परवानगी नाही तसेच या झोनमध्ये खासगी कार्यालयेही बंदच राहतील. याव्यक्तिरिक्त असलेल्या रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अटींवर खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये शासकीय कार्यालये ही पूर्वीप्रमाणे पाच टक्के कर्मचार्यांसह सुरू राहतील, तसेच ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये 33 टक्के कर्मचार्यांसह खासगी व शासकीय कार्यालये सुरू राहतील. याशिवाय सर्व झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे.
मद्यविक्रीसही सरकारची परवानगी ऑरेंज व ग्रीन झोनव्यक्तिरिक्त कंटेन्मेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टँड अलोन) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्यविक्रीच्या दुकानांचा समावेश आहे, मात्र एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत. ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यांसारख्या इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक असणार आहे, तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजार यामधील दुकाने ही बंदच राहतील.