Breaking News

पनवेल तालुक्यात सहा नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागात तीन असे तालुक्यात एकूण सहा पॉझिटिव्ह रुग्ण रविवारी (दि. 3) आढळले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या 93, तर तालुक्यातील 110 झाली आहे. आजच्या महापालिका क्षेत्रातील रुग्णांमध्ये तिसर्‍यांदा  गोवंडी (मुंबई) येथील यूएसव्ही  फार्मा कंपनीतील कामगाराचा समावेश असल्याने या कंपनीत निर्जंतुकीकरण आणि कमीत कमी उपस्थिती ठेवण्याचे निर्देश

देण्यात आले आहेत. दरम्यान, उरण मोरा येथील कोरोनाबाधित पोलिसानंतर पत्नी व आता 11 वर्षीय मुलीलाही लागण झाली आहे. हा नवा रुग्ण धरून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 128 झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 2 ई येथील 63 वर्षीय व्यक्ती उपचारासाठी नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात गेली असता त्या ठिकाणी तिला संसर्ग झाला आहे. तळोजा येथील 27 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून, ती काही दिवसांपूर्वी दहिसरहून तळोजा येथे माहेरी आली होती. तिचे पती कामानिमित्त तळोजा येथून रोज दहिसरला जात असतात. त्यांच्यामुळे तिला संसर्ग झाला असावा असा निष्कर्ष आहे. कामोठे येथील सेक्टर 36मधील 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, तो गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीत कामाला आहे. या कंपनीतील दोघांना आणि त्यांच्या घरातील व्यक्तींना यापूर्वी संसर्ग झालेला आहे. रविवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1038 जणांची टेस्ट केली गेली. त्यापैकी 18 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी 57 जणांवर उपचार सुरू असून, 34 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी तीन नवीन रुग्ण आढळले. विचुंबे येथील साईनील सोसायटीत राहणार्‍या व मुंबईला महापालिकेत जाणार्‍या 39 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. पाली देवद (सुकापूर) येथील 44 वर्षीय व्यक्ती आणि उलवे सेक्टर 8 मधील 73 वर्षीय व्यक्तीलाही लागण झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये 17 कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply