पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे पनवेलसह रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश राज्यातील तब्बल एक हजार 200 मजूर, व्यक्तींना बुधवारी (दि. 6) रात्री 12.45 वा. विशेष रेल्वेने रेवा येथे रवाना करण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या गावाकडे व घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.
या वेळी पनवेल रेल्वेस्थानकावर कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप आदी उपस्थित होते.
रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर, व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, पनवेल तालुक्यातील विविध भागामधून पनवेल रेल्वेस्थानक येथे बसने आणण्याची व्यवस्था विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली, तर मध्य प्रदेश शासनाने या मजूर, व्यक्तींचा रेल्वेने जाण्याचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. रेल्वेने जाणार्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आली आहेत. या वेळी उपस्थित सर्वांकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने या प्रवाशांना रेल्वेत सुखरूप बसविण्यात आले.
रेल्वे विभागाने रेल्वेगाडी सॅनिटाइझ करून रेल्वेस्थानकावर निर्जंतुकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. प्रवाशांना मास्कचे वाटपदेखील या वेळी करण्यात आले. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी शासनाचे, प्रशासनाचे तसेच रेल्वेस्थानकावर उपस्थित प्रत्येकाचे आभार मानले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …