रसायनी : प्रतिनिधी
महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित येथील पिल्लई एचओसीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मॅकॅनिकल आणि ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट या कमीत कमी वजनाच्या कारची निर्मिती केली आहे. ही कार बनविण्यासाठी दुचाकीचे इंजीन वापरण्यात आले आहे.
पिल्लई महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांनी आर वन फाय या दुचाकीचे इंजीन वापरून वेगाने धावू शकणारी कार तयार केली आहे. या कारचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी करून दाखविले. या वेळी प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. पिल्लई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली कार जीआरडीसी स्पर्धेत उतरणार आहे. ही स्पर्धा दिल्लीतील नोएडा येथे होणार आहे.
कार बनविण्यासाठी पिल्लई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई यांनी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले. या वेळी संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. निवेदिता श्रेयांश, उपसचिव डॉ. लता मेनन आदी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कार बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य मधुमिता चॅटर्जी, मॅकॅनिकल ऑटोमोबाईल विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. पाटील, प्रा. डॉ. एम. बी. नाडार, वैभव भगत आदींचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी पिल्लई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कारने नवी मुंबईतील स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला आहे. आता दिल्ली येथे आयएसएनईई या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत ही कार उतरणार आहे.