Breaking News

खालापुरातून मजुरांच्या सहा बसेस रवाना

खोपोली ः प्रतिनिधी

पोटाला चार घास देणार्‍या मातीशी कोरोनामुळे घ्याव्या लागणार्‍या फारकतीने ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा घेऊन अनेक मजूर कुटुंबासह बुधवारी

(दि. 13) संध्याकाळी खालापुरातून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले. या मातीशी असलेले प्रेम जय महाराष्ट्रच्या घोषणा देत सर्वांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित सर्वच भारावले होते.

खालापूर हा औद्योगिक तालुका आणि नवी मुंबईलगत असल्याने हजारो मजूर कुटुंबे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आणि परराज्यातून दोन वेळच्या रोजीरोटीसाठी येथे येतात, परंतु कोरोनामुळे हाताला काम नाही आणि गाठीशी पैसाही नाही अशा कात्रीत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी एसटीने सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. खालापूर येथून बुधवारी सहा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. तहसीलदार इरेश चप्पलवार, नायब तहसीलदार कल्याणी मोहिते, पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि एसटी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सहा बसेसमधील मजूर कुटुंबांना निरोप देण्यात आला. सोलापूर येथील दुधणी येथे या कुटुंबांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या सहकार्याने आतापर्यंत विविध राज्यांतील मजुरांसाठी सहा बसेस सोडण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची तपासणी करून एका बसमध्ये 22 जण बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आणखीही काही मजुरांना गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान मजूरांनी सामाजिक अंतर राखावे. -इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply