आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी
प्रत्येकाने आपल्या जीवनात तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा विचार करून त्यासाठी कृती करणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) फडके नाट्यगृह येथे केले. मधुमेह (डायबिटीज) मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पनवेल महापालिका आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीजमार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 7 व 8 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेले मधुमेह मोफत मार्गदर्शन शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगचे डॉ. अशोक मेहता होते, तर महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, सचिन जाधव, सुधाकर मोरे, राजयोगिनी तारादीदी, डॉ. शुभदा नील आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून मधुमेहामुळे आपल्याला अनेक बंधने पाळावी लागतात, पण सुरुवातीलाच समजले तर आपल्याला थोडीशी काळजी घेऊन तो नियंत्रणात आणता येतो. मी स्वत: पहिल्या स्टेजमध्ये असून, डाएट सुरू केले. त्यामुळे नंतर होणारा त्रास कमी झाल्याचे
त्यांनी सांगितले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी डॉ. शुभदा नील आणि डॉ. कीर्ती समुद्र यांचे कौतुक करून भविष्यातही त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पनवेल महापालिका पहिल्या टप्प्यात एक हजार कॅन्सर सर्व्हायकल महिलांचे लसीकरण करणार असल्याची माहिती देऊन हा डायबिटीजचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता कायम सुरू ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. अशोक मेहता यांनीही आपले विचार मांडले.