रोहे : प्रतिनिधी
कोरोनाचे संकट वाढत असताना नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीमुळे होतो. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे, परंतु गुरुवारी (दि. 14) रोह्यात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
नो सोशल डिस्टन्स, नो मास्क असे चित्र गुरुवारी बाजारपेठेत काही ठिकाणी दिसून आले. रोहा बाजारपेठेत सकाळपासूनच खरेदी करण्यासाठी नगरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. भाजीपाला, किराणा माल तसेच अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. महत्त्वाचे म्हणजे तरुणांपासून वयोवृध्दांपर्यंतचे नागरिक खरेदीसाठी आले होते. या वेळी गृहिणींचीही मोठी गर्दी दिसून आली. यासह ग्रामीण भागात मुंबईहून आलेले मुंबईकर बाजारात खरेदीसाठी आले होते.
पोलीस, आरोग्य विभागासह नगरपालिका व शासन नागरिकांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र लढत आहे, परंतु ज्यांच्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत ते मात्र बिंदास्तपणे फिरताना दिसत आहेत. रोहा तालुका अद्याप कोरोनापासून सुरक्षित आहे, मात्र रोहा तालुका यापुढेही सुरक्षित ठेवायचा असेल तर प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.