नागोठणे : प्रतिनधी – नागोठण्यात आढळलेला प्राणी हा हिंस्र प्रकारातील नसून ते रानमांजर होते, असा निर्वाळा येथील वन विभागाचे मुख्य वनाधिकारी किरण ठाकूर यांनी दिला असून, स्थानिक जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.
नागोठणे शांतीनगर भागातील सूर्यदर्शन कॉलनी तसेच टॉकीज परिसरात गुरुवारी (दि. 21) सायंकाळी वाघ आला असल्याचा गोंगाट झाल्याने उत्सुकतेने शहराच्या सर्वच भागांतील लोकांनी त्या ठिकाणाकडे धाव घेतली. पोलीस तसेच वन विभागाचे कर्मचारीसुद्धा तेथे दाखल झाले. या प्रकारानंतर अफवेला आणखी जोर चढून बिबट्याचे पाच छावेसुद्धा येथे आले असल्याचे काही जण बोलू लागले होते. प्रत्यक्षात प्राणी कोणता आहे, हे स्पष्ट होत नसताना कोणीतरी या प्राण्यांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या वेळी वन विभागाने हा प्राणी, वाघ नसून जंगलात वास्तव्यास असणारे रानमांजर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्याने सर्व नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
याबाबत येथील वनाधिकारी किरण ठाकूर यांना विचारले असता, या भागात रात्री शिरणे अडचणीचे असल्याने रात्रभर आमचा कर्मचारी बाहेरच्या भागात लक्ष देऊन होता. सकाळनंतर कर्मचार्यांसह हा भाग स्वतः पिंजून काढला असून हे रानमांजर त्यापूर्वीच तेथून निघून गेले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. एखादा प्राणी नक्की कोणता आहे याची ठामपणे खात्री केल्याशिवाय कोणीही कोणत्या तरी प्राण्याचे नावाने अफवा पसरवून वातावरण दूषित करू नये, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.