Breaking News

भीती टोळधाडीची!

लोक एका विचित्र मन:स्थितीत आहेत. दोन महिने घरात कोंडून घेऊन राहणे ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. त्यामुळेच आता खरोखरीच लोकांचा धीर हलकेहलके ओसरू लागला आहे. असेच किती काळ बसायचे ही भावना बळावते आहेच. पण त्याचवेळेला राज्यातील व विशेषत: मुंबईतील करोनासंदर्भातील वाढती आकडेवारी लोकांना धास्तावतेही आहे.

कोरोनाच्या फैलावामुळे मार्चच्या अखेरीस देशात कठोर लॉकडाऊन लादण्यात आला आणि कधीही न थांबणार्‍या महानगरी मुंबई व आसपासच्या प्रदेशातील लोक घरात कोंडले गेले. चौथ्या लॉकडाऊनमध्ये देशाच्या अनेक भागांत निर्बंध शिथिल झाल्याने जनजीवनातील दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात पूर्ववत झाले. महाराष्ट्रात ग्रामीण भागात काही प्रमाणात हे चित्र पहायला मिळते आहे. परंतु मुंबई आणि आसपासचा प्रदेश रेड झोनमध्ये येत असल्यामुळे येथील बहुतांश लोक आजही घरातच अडकून आहेत. दरखेपेला लॉकडाऊन संपुष्टात येण्याचा दिवस जवळ येऊ लागला की आता तरी निर्बंध खुले होणार का, सारे व्यवहार पूर्ववत सुरू होणार का याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आणि पर्यायाने लोकांमध्ये रंगू लागते. सध्याचा लॉकडाऊन संपायला तीनच दिवस उरल्याने पुन्हा एकदा संबंधित खर्‍याखोट्या बातम्या, अफवा पसरणे सुरू झाले आहे. 1 जूनपासून मुंबईत सलून आदी दुकाने सुरू होणार अशी अफवा उठणे हा त्याचाच भाग. अर्थात राज्य सरकारने त्यासंबंधात खुलासा केला असून निर्बंध उठवण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून सलून उघडण्यासंदर्भातली बातमी फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकीकडे किती रुग्णांची नव्याने वाढ झाली, किती जण दगावले याचे आकडे लोकांना भयभीत करतात तर दुसरीकडे अनेकांना आर्थिक चिंताही भेडसावते आहे. स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था पाहून घरबसल्या मन नैराश्याने झाकोळून जाते. व्यवसाय-धंदा करणार्‍यांच्या उत्पन्नावर कमालीचा परिणाम झालाच आहे. अनेकांचे उत्पन्न गेले दोन महिने पूर्णपणे थांबले आहे तर नोकरदार मंडळींना पगारकपातीला तोंड द्यावे लागते आहे. सध्या थोड्याफार फरकाने प्रत्येक जण धास्तावलेला, उद्याच्या चिंतेने खंतावलेला असाच आहे. अशा अवस्थेतील मने खरे-खोटे तपासून न घेता कशी पटकन एखाद्या गोष्टीने भयभीत होऊ शकतात याचे दर्शन गुरूवारी मुंबईत टोळधाड अवतरल्याचे फेक व्हिडिओ व्हायरल होण्यातून घडले. काही नामवंतांनीही लागलीच टोळधाडीच्या या फेक व्हिडिओला ट्विटर आदी समाजमाध्यमांवरून प्रसारित केल्याने ते व्हायरल होण्यास हातभारच लागला. या भीतीची दखल थेट विमानतळ प्राधिकरणालाही घ्यावी लागली आणि तूर्तास तरी अशी एखादी टोळधाड नजरेस पडत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. आलीच टोळधाड मुंबईत तर विमानवाहतुकीला त्यापासून धोका नाही वगैरे वगैरे खुलासाही त्यांनी केला. टोळधाड महाराष्ट्रात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवतरल्याच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु तिथेही सुदैवाने अन्य काही राज्यांप्रमाणे फार मोठे नुकसान झालेले नाही. राज्यातील शेतं पेरण्यांच्या प्रतिक्षेत आहेत, त्यामुळेच टोळधाडीचा धोका तुलनेने कमी आहे, असे तज्ज्ञांनी यासंदर्भात म्हटले आहे. मुंबईसारख्या दमट हवामानाच्या प्रदेशात हे वाळवंटातील कीटक अवतरण्याची शक्यताही खूपच कमी आहे असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु धास्तावलेल्या मनांना तपशीलांपर्यंत जाण्याचे भान राहात नाही. घरात कोंडून घेतलेल्या लोकांनी भीतीने खिडक्याही घट्ट लावून घेतल्या. या भयभीत मनांना सकारात्मकतेची गरज आहे हे नक्की.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply