भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी
नागरिकांना चांगले आरोग्य देता यावे यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरू झाले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी यामधून घेतली जाणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे, असे आवाहन या वेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुणे, पिंपरी-चिंचवड येथील भाजप वैद्यकीय सेलतर्फे घरकुल लॉन्स येथे ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्यावेळी पाटील बोलत होते. वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपले, आयुर्वेद डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. तेजस्विनी अरविंद, डॉ. मनिषा जाधव, डॉ. ऐश्वर्या सुपेकर, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. प्रदीप नरवणे, डॉ. शुभदा कामत, शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, डॉ. संदीप वाघ, धर्मेंद्र खंदारे, डॉ. सुनील चौहान, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आयुष्यमान भारतासाठी नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळावे, या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. हे अभियान गावोगावी, वाड्या-वस्त्यांमध्ये पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या कार्यशाळेत डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सागर पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.