मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना सध्या एका नव्याच आजाराचा सामना करावा लागत असून या आजारामुळे डोळे व मेंदूवर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. या आजाराने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ’म्युकरमायकोसिस’ असे या गंभीर आजाराचे नाव आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2000 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे.
ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
तसेच या आजारावर उपचार हा जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्यण घेण्यात आला आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
या आजारावरील औषधे एमपी-एंपोथेरिसीन सर्वत्र उपलब्ध आहेत, मात्र मागणी वाढल्यामुळे या औषधाच्या किमती अडीच हजार रुपयांवरून थेट सहा हजार रुपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. हे लक्षात घेता या औषधाचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला जणार आहे, असेही टोपे यांनी म्हटले आहे.
ठाण्यातही आढळला रुग्ण
ठाणे ः ठाण्यातही एका रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्याचे निदान झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका 56 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली. या महिलेवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच्या काळात तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आलं. या लक्षणाची गंभीर दखल घेत रुग्णालयाने त्या महिलेच्या काही चाचण्या केल्या. या चाचणी अहवालातून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या आजाराचे रुग्ण यापूर्वी नागपूर, नाशिक, नंदूरबार, या जिल्ह्यातही आढळून आले आहेत.