श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था
तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ’इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. चंद्रावर उतरणार्या पहिल्या भारतीय यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर उपस्थित होते. देशभरातून आलेल्या शेकडो नागरिकांनी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनीही या वेळी गर्दी केली होती. उड्डाणाला 56 मिनिटे आणि 24 सेकंद राहिले असताना अचानक काऊंटडाऊन थांबवण्यात आले. थोड्याच वेळात ’चांद्रयान-2’चे सोमवारचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा नियंत्रण कक्षामधून करण्यात आली. ’इस्रो’ने अधिकृत पत्रक काढून काऊंटडाऊनदरम्यान रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड दिसल्यामुळे सावधानता बाळगून आजचे उड्डाण स्थगित करण्यात येत आहे. प्रक्षेपणाची नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. अखेर आता इस्रोने चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर केली आहे.