उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाचा फटका उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला असून, आग्नेय दिशेकडून उत्तरेकडे हे वादळ चक्री फिरवत मोठ्या ताकदीने आलेल्या चक्रीवादळाने करंजा, पिरवाडी, केगाव दांडा आणि मोरा समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या. उरण तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या चक्रीवादळात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र, सोसाट्याच्या वार्यामुळे तालुक्यात 542 घरांचे पत्रे उडाले, 18 शाळांचे नुकसान झाले. पिरवाडी येथील कातकरी वाडी येथील पाण्याची टाकी, धुतुम ग्रामपंचायतीचे सोलर, 159 (लाईट) वीजेच्या पोलचे नुकसान झाले. तर 170 झाडे कोलमडली, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. भातशेतीच्या पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच घरांच्या छपरांचे मोठे नुकसान झाले असून, हातात पैशाची आवक नसल्याने सामान्य नागरिक मोठया संकटात अडकले आहे.
तर तालुक्यातील गाव अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यावरील विद्युत वाहिनीचे लोखंडी खांबे ठिकठिकाणी कोसळल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांची विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठी कसोटी लागणार असून, बुधवारी गायब झालेली वीज सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर कोसळलेले विद्युत खांबे उभे करण्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागणार असल्याचा अंदाज येथील महावितरण कर्मचार्यांनी
व्यक्त केला आहे.
राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी
समुद्रकिनापट्टीवर वास्तव्य करणार्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाने वेळीच स्थलांतरित केल्याने जीवित हानी सुदैवाने टळली. परंतु नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांच्या छपरांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना राज्य शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तालुक्यातील चक्रीवादळग्रस्तांनी केली आहे.