तिघांचा मृत्यू; 173 जणांची कोरोनावर मात
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 4) कोरोनाचे 122 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला, तर 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 23 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला. 38 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
कामोठे सेक्टर-11 त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि खारघर घरकुल, कुंजविहार सोसायटीमधील व्यक्तींचा बाधितांमध्ये समावेश आहे. मंगळवारी कळंबोलीत 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1297 झाली आहे. कामोठेमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 1496, तर खारघरमध्ये 10 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1379 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1234, तर पनवेलमध्ये सहा नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 1333 झाली. तळोजात पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 436 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 7175 रुग्ण झाले असून 5642 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.63 टक्के आहे. 1361 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 172 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 23 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे पाच, वावंजे, चिंध्रण, चावणे, सुकापूर, वारडोली प्रत्येकी दोन, तर उसर्ली खुर्द, शेलघर, सांगडे, मालेवाडी, भिंगार, पळस्पे, कुंडेवहाळ आणि आपटे येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळला. उलवे सेक्टर-17 लक्ष्मी कॉर्नर येथील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 38 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2230 झाली असून 1842 जणांनी कोरोनावर मात केली, तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये 11 कोरोनाबाधित; 13 जणांना डिस्चार्ज
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यात मंगळवारी (दि. 4) 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशिप, गणेशनगर करंजा रोड उरण प्रत्येकी दोन, तर जसखार, जासई, धुतूम, मोरा कोळीवाडा, बोरी, उरण, डोंगरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नवापाडा करंजा, उरण, जसखार प्रत्येकी दोन, तर सुष्मा विहार करंजा, रांजणपाडा, नवीन शेवा, उरण (ग्रँड व्हिला), चिरनेर, भेंडखळ, सारडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 925 झाली आहे. त्यातील 720 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 174 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची महिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
महाडमध्ये चौघांना लागण
महाड ः प्रतिनिधी
महाडमध्ये मंगळवारी (दि. 4) चौघांना कोरोनाची लागण झाली असून, चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकाचा मृत्यू झाला. महाडमध्ये कोरोनाचा फैलाव काहीसा कमी झालेला दिसून आला आहे. लागण झालेल्या रुग्णांत अमेहेत हाऊस महाड, पानसारी मोहल्ला, कोटेश्वरी तळे, खारकंड मोहल्ला येथील व्यक्तींचा समावेश आहे. महाडमध्ये 135 रुग्ण उपचार घेत असून, 329 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला. महाडमध्ये एकूण 490 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जत तालुक्यात आठ जणांना बाधा
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. मंगळवारी (दि. 4) तालुक्यात नवीन आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते सर्व रुग्ण कर्जत नगरपरिषद हद्दीतील आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 559वर पोहचली असून 439 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी कर्जत शहरातील म्हाडा वसाहतीमध्ये राहत असलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती पिढीजात गणेशमूर्तींचा व्यवसाय करते. कोतवाल नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी ज्या मुलीला कोरोनाची बाधा झाली होती त्या मुलीच्या 46 वर्षीय आई व 45 वर्षीय काकीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दहिवली येथील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. ही व्यक्ती कर्जत नगर परिषदेत सफाई कामगार आहे. दहिवली गुरव आळीतील 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच मुद्रे बुद्रुक विभागातील इमारतीत राहणार्या एका 52 वर्षांच्या नेत्र चिकित्सकाचा, त्याच्या 45 वर्षांच्या पत्नीचा व 24 वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.