मुंबई : प्रतिनिधी
दहशतवाद पसरवणार्या देशांशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संबंध तोडावेत, अशी मागणी भारतीय क्रिकेट बोर्डाने केली होती, पण त्यात पाकिस्तानचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला नव्हता. यासंदर्भात बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांना विचारल्यावर आपण ते पत्र लिहिलेले नाही, असे सांगून त्यांनी यासंदर्भात हात वर केले.
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी हे पत्र आयसीसीला लिहिले होते, पण त्या पत्रानुसार दहशतवाद पसरविणार्या देशांशी संबंध तोडण्याची मागणी आयसीसीने फेटाळली. अशा प्रकरणात आयसीसी कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. आयपीएलचे पुरस्कर्ते म्हणून टाटा मोटर्स हॅरिअरची घोषणा करण्यासाठी आलेल्या चौधरी यांनी पत्रकारांनी या पत्राविषयी विचारल्यावर हे पत्र आपण लिहिलेले नाही, असे ते म्हणाले.
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी यांनी प्रशासकांशी सल्लामसलत करून हे पत्र आयसीसीला पाठविले. त्या पत्रात वर्ल्डकपमधील भारताच्या सुरक्षेबाबतच्या मुद्द्यावर आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केली, पण दहशतवादी देशांशी संबंध तोडावेत या मागणीबाबत आपण कोणतेही पाऊल उचलू शकत नाहीत, असे आयसीसीने स्पष्ट केले होते.
चौधरी म्हणाले की, आगामी वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा बीसीसीआयच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. तो त्यांनी आपल्या पत्रात मांडला आहे. दुसरा मुद्दा हा दहशतवादाशी संबंधित होता. दहशतवाद पसरविणार्या देशांशी संबंध तोडावेत असे बीसीसीआयने म्हटले असले, तरी त्यात नेमक्या कोणत्या देशाबद्दल त्याचा उल्लेख नाही. चौधरी यांनी उत्तेजकविरोधी धोरणाबाबत बीसीसीआयच्या भूमिकेवरही टिप्पणी केली.