Breaking News

व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिकांपुढे आर्थिक प्रश्न

पनवेल : बातमीदार

टाळेबंदीमुळे जिम व व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिक व प्रशिक्षकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्यापासून उत्पन्न पूर्ण थांबल्याने ’तंदुरुस्त’ असलेल्या या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. ’कोरोना संसर्गामुळे जिम बंद ठेवणे योग्य होते; पण आता व्यायामात सातत्य नसल्याने लोकांना आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागले आहेत.

14 मार्चपासून थिएटर व मॉलसह जिम बंद आहेत. शहरात सुमारे पाच हजार जिम असून प्रत्येक जिममध्ये सुमारे आठ- दहा लोक काम करतात. या सरासरीने पन्नास हजार लोकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा जगण्याचा प्रश्न गडद झाला आहे. जिम बंद असल्याने आर्थिक नुकसान तर मोठ्या प्रमाणात होत आहेच; पण रोज व्यायाम करू न शकणार्‍यांच्या आरोग्याचेही नुकसान होत आहे. स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंचे नुकसान होत आहे.

व्यायामामध्ये खंड पडत असल्याने शरीररचना बदलण्याची शक्यता आहे. घरी व्यायाम करता येत असला, तरी त्याला जिमची सर नसते. जिममध्ये प्रेरणादायक वातावरणात व्यक्ती सहज व्यायाम करू शकते. आर्थिक नुकसानासोबत हे नुकसान मोठे आहे. प्रशिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैराश्य येऊ लागल्याने लोक जिम कधी सुरू होणार, अशी विचारणा करत आहेत. ऑनलाइन मार्गदर्शनाला मर्यादा आहेत,’ असे जिम व्यावसायिक व प्रशिक्षकांनी सांगितले.

हजारो प्रशिक्षक या व्यवसायावर अवलंबून आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये खर्च भागला, पण आता अनेक तरुणांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. उत्पन्न नसल्याने वेतन व जिमच्या जागेचे भाडे कसे द्यायचे, हे प्रश्न आहेत. लहान जिम बंद होण्याची शक्यता आहे. जिम सुरू झाल्या, तरी आर्थिक अडचण लगेच सुटणार नाही. कोरोना विषाणूचे संकट टळले, की जिम व्यवसाय भरभराटीला येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पुढील काळात भरभराटीची शक्यता

कोरोनावर सध्या कोणतेही औषध नसल्याने आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्यायाम आणि प्रतिकारक्षमताच महत्त्वाची असल्याचे लोकांना पटू लागले आहे. नियमित व्यायाम करणारी व्यक्ती कोरोनाशी मुकाबला करू शकते. त्यामुळे यापुढील काळात अशा कोणत्याही आजाराशी मुकाबला करायचा असल्यास व्यायाम गरजेचा असल्याने या व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे,’ असा अंदाज वर्तवला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply