Breaking News

‘पनवेलमध्ये कोरोनाचे मृत्यू नियंत्रणात’

पनवेल : बातमीदार

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे झालेले मृत्यू केवळ कोरोनाची लागण झाली म्हणून नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. पनवेलमध्ये आजवर 36 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोन रुग्णांना उपचार उशिरा मिळाल्यामुळे मृत्यू झाला.

मार्च महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठ्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. रायगड जिल्ह्यातील एकमेव महापालिका आणि शहरीकरण झालेल्या पनवेल तालुक्यात जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे तालुका रेडझोन घोषित करण्यात आला.

महापालिका क्षेत्रात कामोठ्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे कामोठे शहरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.

महापालिका क्षेत्रात आजवर 861 जणांना कोरोनाची लागण झाली. तर त्यापैकी 596 जण करोनातून बरे झाले आहेत. सध्या 229 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर 36 जणांचा मृत्यू झाला. पनवेलमध्ये मृत्यूचा टक्का 4 ते साडेचार टक्के इतकाच आहे. 4 टक्के मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये फक्त कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण तर नसल्यासारखेच आहे.

36 रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, वयोवृद्ध नागरिक आणि मूळातच शारीरिक अशक्तपणा असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. यांसारखे आजार असलेल्या रुग्णांवर कोरोनासाठी देण्यात आलेल्या आजारांनी परिणाम होत नसून रुग्ण बरे होत नाहीत.

इतर रुग्णांना मात्र करोनाच्या औषधाचा परिणाम तातडीने होत असून पाच दिवसांच्या औषधांमध्ये रुग्ण ठणठणीत बरा होत असल्याचे आजवरच्या पाहणीत दिसले आहे.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आजवर तीन रुग्ण दगावले असून या तिन्हीही रुग्णांना मधुमेहाचा तीव्र त्रास, रक्तदाब आणि कॅन्सरचा आजार होता, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील इतर मृत्यू विविध खासगी रुग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये झाले असून पूर्वीपासून उपचार सुरू असलेले हे रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेने वेळोवेळी दिली आहे.

‘ते’ उशिरा उपचाराचे बळी

पनवेल महापालिका क्षेत्रात करोना झालेल्या दोन रुग्णांना इतर कोणताही त्रास नव्हता. करोना झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूला त्यांनी उपचारासाठी केलेला विलंब हे कारण देण्यात आले आहे. दोघांना रोनाची लक्षणे आढळूनही परस्पर घरच्या घरी उपचार घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी उपचार घेण्यास अधिक उशीर झाल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला, असे मत पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply