Breaking News

ग्रामीण भागाची कसोटी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील काही शहरी भागांमध्ये कोरोनाचा आलेख किंचित उताराला लागल्यासारखा वाटतो आहे. रुग्णसंख्यावाढ मंदावलेली दिसत असली तरी शहर भागामध्ये मृत्यूदर मात्र अजुनही चढाच आहे. ग्रामीण भागात मात्र चिंताजनक परिस्थिती असून अनेक ठिकाणी संसर्ग वाढतो आहे. तेथील आरोग्य यंत्रणा देखील हतबल झालेल्या दिसून येत आहेत.

मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवल्याबद्दल राज्य सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. राज्य सरकार आणि विशेषत: मुंबई महापालिकेचे प्रशासन यांनी कोरोनाशी मुकाबला करताना जी काही पावले उचलली, त्याचे कौतुक केंद्रीय आरोग्य विभाग आणि निती आयोगाने देखील केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुंबईतील कोरोना प्रतिबंधक आरोग्यव्यवस्थेविषयी चांगले उद्गार काढताना दिसले. इतकेच नव्हे तर, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटल्याचा दावाही शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. बाहेरील उच्च पदस्थांनी मुंबईचे प्रशासन आणि राज्य सरकार यांचे कौतुक केले असले तरी जमिनीवरचे वास्तव मुंबईकर जाणतात. मुंबई महापालिकेतर्फे राबवण्यात येणार्‍या लसीकरण मोहिमेचा किती बोर्‍या वाजला आहे हे आपण सारे पाहतोच आहोत. लसींच्या मात्रा सर्वांनाच कमी प्रमाणात मिळत आहेत. मुंबई देखील त्याला अपवाद कशी असणार? परंतु उपलब्ध लसींचा उपयोग व वाटप योग्य पद्धतीने झाले का हा खरा प्रश्न आहे. लसीकरणाची मोहीम असमाधानकारक पद्धतीने चालली आहे असे राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुखही मान्य करतात. ज्यांना लसीकरणाची मोहीम धड राबवता येत नाही, त्यांनी कोरोनाची लाट यशस्वीपणे थोपवून धरली असे कशाच्या जोरावर म्हणायचे? अर्थात, असले प्रश्न विचारून सरकारी यंत्रणांना अडचणीत आणण्याची ही वेळ नव्हे हे सार्‍यांनाच कळते. त्याऐवजी आजवर झालेल्या चुका विसरून कोरोनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाटेसाठी सुसज्ज राहण्याची खरी गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने वृद्ध व्यक्तींचे बळी घेतले. सध्या सुरू असलेली दुसरी लाट तरुणांना त्रस्त करीत आहे असे आकडेवारी दर्शवते. तिसर्‍या लाटेमध्ये कोरोनाचा रोख लहानग्या मुलांकडे वळेल अशी भीती आहे. त्यासाठी ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णता, औषधांचा पुरेसा साठा, इस्पितळांतील सुसज्ज खाटा यांची गरज लागेलच. परंतु त्याबरोबरच तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सेस यांचा ताफा उपलब्ध असावा लागणार आहे. आपले मायबाप सरकार हे मनुष्यबळ कुठून मिळवणार हाही एक प्रश्नच आहे. ऐनवेळेला नेहमीप्रमाणे केंद्र सरकारकडे मदतीची याचना करून भागणार नाही. कोरोना विरुद्धची लढाई ही प्रत्येकाला लढावी लागणार आहे. एकमेकांमधील हेवेदावे आणि राजकीय उखाळ्या-पाखाळ्या यांना पूर्णत: चाट देऊन जोरदार कामाला लागावे लागणार आहे. दुसर्‍या लाटेशी सामना करताना आपली आरोग्य यंत्रणा बरीच थकली आहे. तरी देखील न थकता, न थांबता लढावेच लागेल. विक्रमी वेगात लसीकरण करून कोरोनाची तिसरी लाट नक्कीच रोखता येईल. किंबहुना, लसीकरण हे या तिसर्‍या टप्प्यातील लढाईतील आपले प्रमुख अस्त्र असणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही संस्थांनी राजकारण बाजूला ठेवून समन्वयाने लसीकरणाचे लक्ष गाठले पाहिजे. या मधल्या काळामध्ये ग्रामीण भागाची खरी कसोटी लागणार आहे. कारण शहरी भागांमधील व्यवस्था तेथवर अजून पोहोचलेल्या देखील नाहीत.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply