Breaking News

भविष्यातील पोर्टफोलिओत सोने का हवे?

गुंतवणुकीत सोने असावे की नसावे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, पण नजीकच्या भविष्यात जग अस्थिर राहणार असल्याने सोने विक्रमी वाढले असतानाही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

जे चमकतं ते सर्वच सोनं नव्हे, असं म्हटलं जातं. म्हणूनच खर्‍या सोन्याची किंमत मंदीमध्येच कळते. मागील एक वर्षांपासून आपण सोन्यामध्ये तेजी अनुभवत आहोत. मागील वर्षी जुलै महिन्यात सोन्याचा भाव रु. 32000 च्या आसपास होता आणि आता या जुलैमध्ये तो 42 हजारांवर आहे, म्हणजेच 30 टक्के तेजी एका वर्षात आणि तरी देखील सोन्यातील तेजी काही कमी होताना दिसत नाहीये. पाहुयात यामागील कारणं.  

सर्व जगभर अजूनही करोनाचं भय कमी झालेलं नाहीयेय. गेल्या चार महिन्यांत जागतिक अर्थव्यवस्था ठप्प आहे व अनेक विश्लेषक पुढील दोन वर्ष सर्व प्रमुख अर्थव्यवस्थेबद्दल नकारात्मक विचारात आहेत. दुसरीकडं प्रॅक्टिकली अमेरिका चीनबरोबर व्यापार युद्ध गमावताना दिसत आहे आहे, त्याच अनुषंगानं भारतीय अर्थमंत्र्यांचं लेटेस्ट विधान देखील हेच दर्शवत आहे की चीन उत्पादनांवर संपूर्ण बहिष्कार टाकणं देशाच्या हिताचं नाहीय. त्यातच, चीन भारताविरुद्ध करत असलेली गलवान खोर्‍यातील तयारी आणि अशा वेळी भारतास हात देऊ केलेला जपान एक वेगळंच चित्र उभं करतोय.

दुसरीकडं जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या अध्यक्षीय पदाची निवडणूक या वर्षाच्या शेवटास होत आहे आणि त्या अनुषंगानं घेतले जाणारे ट्रम्प प्रशासनाचे निर्णय व धोरणं हे अमेरिकी हितसंबंध आणि अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक वाटत आहेत. देशभक्त असलेल्या अमेरिकन्समध्ये ट्रम्प यांच्या विरोधातील सूर हे बहुधा त्यांची नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी निवडणूक हरण्याची शक्यता वर्तवत आहेत, आणि तसं झाल्यास लहरी डोनाल्ड ट्रम्प हे इतर (काहीही) करू शकतात असं खुद्द त्यांनीच म्हटलेलंय. अमेरिकी जनतेचा कौल (पोल) हा जरी 78 वर्षीय जोसेफ उर्फ जो बिडेन जे डेमोक्रॅट उमेदवार आहेत, त्यांच्याकडं झुकलेला आढळतो तरी मध्यमवर्गीयांच्या हितासाठी लढताना ते किंचित डाव्या विचारसरणीतून सामोरे येतात, अशानं त्यांच्याकडं अमेरिकन हित आणि अर्थव्यवस्था जपणारी पक्की धोरणं आहेत की नाहीत याचा सहज थांगपत्ता लागत नाही. त्यामुळं तमाम जगाचं लक्ष लागून असलेल्या जगाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं जानेवारी 2021 रोजी स्थापन होणारं सरकार कसं असेल आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे येणारा काळच ठरवेल. आणि आपण सर्वचजण अनुभवत आलोय की, जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत आढळल्यास गुंतवणूकदारांचा ओघ नेहमीच सोन्याकडं जाताना दिसतो.

अशा परिस्थिती अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्व बँकांनी आपले व्याजदर कमी केलेले आहेत आणि भारत देखील यात मागं नाही व पुढील काही महिने व्यजदार अजूनही कमीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी गुंतवणूक करण्याजोगा एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे सोनं.

म्हणूनच येथून पुढील काही वर्ष आपल्या पोर्टफोलिओतील 1/3 किंवा फारतर 1/4 हिस्सा सोन्यामध्ये गुंतवणं उचीत राहील असं वाटतंय. तांत्रिकरित्या विचार केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोनं हे 1775 अमेरिकी डॉलर प्रति औंस (म्हणजे 29.35 ग्रॅम्स) या भावानं बंद झालंय. म्हणजेच भारतामधील भाव 1775 ु 29.35 = 60.477 अ‍ॅण्ड डॉलर्स प्रति ग्रॅम, म्हणजेच 60.477 ु 74.68 (अमेरिकी डॉलरचा दर) = 4516.42 म्हणजेच 45164 प्रति तोळा असून, प्रत्यक्ष व्यवहार्य भाव हा त्यावर असलेली स्थानिक ड्युटी व इतर काही गोष्टी गृहीत धरून इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं ठरवलेला भाव हा रु. 48,500 प्रति तोळा आहे. तर मल्टि कमॉडिटी एक्स्चेंजवरील वायदे बाजारातील ऑगस्ट महिन्याच्या सौदेपूर्तीचा (एक्स्पायरी) गेल्या आठवड्यातील भाव रु.48000च्या वरती होता.

गोल्ड शिकागो बोर्ड ऑप्शन इंडेक्सनुसार सोन्यातील सध्याची चंचलता (व्होलॅटिलिटी) ही 20.52 आहे, त्यामुळं पुढील सहा महिन्यांसाठी जरी 10% चंचलता गृहीत धरल्यास सोन्याचा भाव हा       रु. 43200/तोळा गृहीत धरता येऊ शकतो. सोन्यातील मागील एक वर्षातील तेजी गृहीत धरल्यास, 41900 व 40000ह्या पातळ्यांवर त्यास आधार संभवतो, परंतु उर्ध्वदिशेस मोठी तेजी संभवत आहे. दीर्घकालीन ऐतिहासिक आलेखावर 1920 व त्याहीपुढं जाऊन 2500 डॉलर्स प्रति औंस हा भाव निघत आहे. म्हणजेच, इथपासून अनुक्रमे 8.5% व 41% तेजी जाणवत आहे. याचा अर्थ चलन विनिमयाचा दर स्थिर गृहीत धरल्यास 52400 व 68000 ह्या भावपातळ्या निघत आहेत. त्यामुळं पुढील कालावधीसाठी या गोष्टींकडं लक्ष द्यायचं झाल्यास सर्वसामान्यांना माहित असलेले दोन पर्याय म्हणजे आपल्याला सराफ बाजारातून सोनं विकत घेऊन ते सांभाळणं किंवा एमसीएक्सवरील वायदे बाजारात सोन्याचे फ्युचर्स खरेदी करणं. कारण म्हणजे पहिल्या पर्यायात घेताना व विकताना असलेली तफावत, तरलता आणि दुसर्‍या पर्यायासाठी लागणारं भरमसाठ ब्रोकरेजमुळं (सुमारे 3000 रु.) यामुळं तिसरा अत्यंत सोपा पर्याय सर्व गुंतवणूकदार आपलासा करताना दिसत आहेत.        

भारतीय शेअर बाजारात गोल्ड ईटीएफ हा प्रकार आहे, ज्यामध्ये अगदी एखाद्या शेअर खरेदीइतकी घरबसल्या सहज, संपूर्ण कायदेशीर व सुरक्षित आहे आणि ज्यावर ब्रोकरेज देखील लागत नाही. शेअरबाजारात विविध गोल्ड ईटीएफ (म्हणजेच म्युच्युअल फंड्सच्या अशा स्कीम्स ज्या एक्स्चेंजवर रोजच्यारोज व्यवहार करतात) उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात तरल अशा ईटीएफचे नांव आहे, गोल्डबीज. ज्याचा भाव रु. 42.33 आहे. जरी सोन्याच्या किंमतीत व या ईटीएफच्या किंमतीत बराच फरक असला तरी सोन्याच्या भावाप्रमाणेच चढउतार यात देखील होतात, म्हणजेच सोन्याच्या भावात तेजी आल्यास तितक्याच प्रमाणात यात देखील तेजी येणार.

चढता आलेख कायम

मागील आठवड्यात भारतीय शेअरबाजारात चढता आलेखच पाहायला मिळाला. अमेरिकेत कंझ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स अपेक्षेपेक्षा चांगला आला. आणि त्यापाठोपाठ अमेरिकेचा पीएमआय (मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) डेटा सुधारित आला तर गुरुवारी अमेरिकेनं जाहीर केलं की गेल्या महिन्यात सुमारे 48 लाख रोजगार दिले गेले असल्यानं गेला बेरोजगारीचा दर घसरून 11.1 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळं अमेरिकेतील बाजारात तेजी राहिल्यानं, त्याचीच री इतर प्रमुख बाजारांनी ओढली. तसंच चीनचा देखील पीएमआय डेटा अपेक्षेपेक्षा चांगला आल्या कारणानं हळूहळू सर्व प्रमुख राष्ट्रं करोनामुळं आलेल्या मंदीवर मात करत आहेत असं चित्र उभं राहिलं. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 850 अंशांची उसळी मारून 36000 पातळीवर बंद आला तर निफ्टी 224 अंशांची वाढ नोंदवून 6 मार्चनंतर प्रथमच 10600 या पातळीच्यावर (10607.35) बंद झाली. निफ्टी 50 समूहातील हिरो मोटोकॉर्पचा शेअर सर्वाधिक 7.79% वाढला तर कोल इंडियाचा शेअर 4.82 टक्के पडला. जून महिन्यात परकीय गुंतवणूकदार संस्थांनी एकूण 5492.95 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली तर स्थानिक गुंतवणूकदार व म्युच्युअल फंड यांनी मिळून 2434.40 कोटी रुपयांची खरेदी केली. मागील लेखात सांगितल्याप्रमाणं निफ्टी ही तिच्या 10600 या प्रतिकार पातळीपाशीच बंद झालेली आढळून येते. यापुढील वाटचाल देखील तेजीची वाटत आहे व अनुक्रमे 10800 व 11200 ह्या पातळ्या गृहीत धरता येऊ शकतात. खालील बाजूस 10380 व 10100 या आधार पातळ्या संभवतात. 

सुपरशेअर – भारती एअरटेल

मागील आठवड्यात भारतीय कंपनी भारती आणि ब्रिटीश सरकारने उपग्रह ब्रॉडबँड ऑपरेटर ’वनवेब’चा लिलाव जिंकला आहे. या करारामुळे वनवेब एका जागतिक उपग्रहाचे बांधकाम पूर्ण करू शकेल, ज्यामुळं जगभरातील देशांमध्ये मोबाइल आणि स्थिर टर्मिनल्ससाठी वर्धित ब्रॉडबँड आणि इतर सेवा मिळतील. 2014 मध्ये उद्योजक ग्रेग वायलर यांनी स्थापित केलेली वनवेब तथाकथित लो-अर्थ-ऑर्बिट उपग्रह बनवते जी उच्च-स्पीड ब्रॉडबँड संप्रेषण प्रदान करते. मार्च अखेरीस दिवाळखोरी संरक्षण प्रक्रियेत दाखल झालेल्या नक्षत्र उपग्रह ऑपरेटर वनवेबने ब्रिटन सरकारच्या नेतृत्त्वात विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. भारतातील उद्योगपती सुनील मित्तल यांच्या भारती एंटरप्रायजेसचा भाग असलेल्या भारती ग्लोबल आता वनवेबच्या कंपनीकडून मिळणार्‍या ब्रॉडबँड इंटरनेट्स उपग्रह नेटवर्क तयार करण्याच्या योजनांचा पाठपुरावा करण्याची योजना असून युनाइटेड किंग्डम पोझिशनिंग, नॅव्हिगेशन आणि टायमिंग या सेवांचा संभाव्य वापर करू इच्छित आहे. या करारामध्ये भारती ग्लोबल आणि ब्रिटन सरकारने अनुक्रमे सुमारे 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, ब्रिटनने वनवेबमध्ये 20 टक्के इक्विटी हिस्सेदारी घेतली आहे आणि भारती उपग्रह कंपनीला व्यवसाय व्यवस्थापन व व्यावसायिक कामकाज पुरवतील. आता यामुळं ब्रिटीश सरकारच्या सक्रिय पाठिंब्याने आणि सहभागाने वैश्विक माध्यमातून सार्वत्रिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचे वचन देण्याच्या प्रयत्नात भारती पुढाकार घेईल, अशी आशा भारती समूहाचे सर्वेसर्वा सुनील मित्तल यांनी व्यक्त केली. अशाप्रकारे मोठी गुंतवणूक करून त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारती एअरटेल या कंपनीस मिळेल. बाजार खाली येताना या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रत्येक टप्प्यावर रचनात्मक गुंतवणूक केल्यास दीर्घ कालावधीसाठी चांगला नफा पदरात पाडता येऊ शकतो.

(शेअर बाजार हा गुंतवणुकीचा जोखीम असलेला मार्ग आहे. त्यामुळे त्याची पुरेशी माहिती न घेता त्यात पैसे गुंतविणे जोखमीचे ठरू शकते. त्यात नव्याने गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांनी याची जाणीव ठेवूनच हा मार्ग निवडावा.) 

– प्रसाद ल. भावे

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply