Breaking News

‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण केला जातोय -डॉ. विनय सहस्रबुद्धे

पनवेल : रामप्रहर वृत्त
मागील तीन-साडेतीन महिन्यांचा घटनाक्रम पाहता अपप्रचाराची विषारी हवा एखाद्या केमिकल वॉरसारखी समाजात अस्वस्थता निर्माण करायला कारणीभूत ठरत आहे. हा एक प्रकारचा आतंकवाद आहे. चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेत केला त्याबाबत (सीएए) संभ्रम निर्माण करण्याचा खेळ काही राजकारण्यांनी मांडला आहे. दिल्लीतील दंगल त्याचाच परिणाम आहे, असे रोखठोक प्रतिपादन खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त व डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या 23व्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकत्व कायदा या विषयावर खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या व्याख्यानाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, वर्षा ठाकूर, ज्येष्ठ नेत्या कल्पना राऊत, डॉ. सुहास हळदीपूरकर, नगरसेवक विक्रांत पाटील, समीर ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, संतोषी तुपे, समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष किर्ती समुद्र, कार्यवाह राजीव समेळ उपस्थित होते.
डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, दिल्लीत जे घडले ते विचारी माणसाला चिंता करायला लावणारे आहे. हत्या, दंगल, जाळपोळ, जीवित व मालत्तेचे नुकसान होणे ही लज्जित करणारी घटना आहे. परिस्थिती आटोक्यात आल्याचे समाधान मनात आले असले, तरी ही दंगल कशामुळे निर्माण झाली व कुणी केली? गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकित शर्माला 400 वेळा भोसकून जीवे मारले जाते. त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात येतो. ही अमानूषता येते कुठून हा प्रश्न पडेल, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. या कायद्याबाबत भीती का, तर अनेक वर्षांपासून मतपेटीचे राजकारण काही मंडळी करीत आली आहेत आणि यातूनच असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधून सांगितले.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply