नवी मुंबई ः बातमीदार
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला असला तरी अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका आयुक्तांनी विभागनिहाय नियुक्त केलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकार्यांना संबंधित विभागातील पोलीस यंत्रणेसह प्रभावी अंमलबजावणीकडे दररोज नियमित विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व विभाग अधिकार्यांनी केलेल्या कारवाईत तीन दिवसांत दोन लाख 22 हजार 800 रुपयांची दंडात्मक कारवाई
करण्यात आली.
लॉकडाऊनच्या जाहीर नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसेच काही विभागांमध्ये रितसर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईच्या सेंटर वन मॉलमधील वाशी सेंट्रल दुकानासासह इतर विभागांत सहा दुकानदारांवर लॉकडाऊन उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सेंटर वन मॉलमधील वाशी सेंट्रल दुकानात अत्यावश्यक वस्तूंखेरीज छुप्या पध्दतीने इतर वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. या ठिकाणी अत्यावश्यक मालाखेरीज इतर मालाची विक्री झाल्याचे 4 जुलैचे देयक हाती लागल्याने या पुराव्याच्या आधारे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वाशी विभाग कार्यालयामार्फत सदर धडक कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारे कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात चार, तर तुर्भे क्षेत्रात दोन दुकानदारांवर लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.