कामोठे ः प्रतिनिधी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. अटी-शर्थींसह जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी ते अपरिहार्य झाले आहे. अशा परिस्थितीत एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामोठ्यातील उषा डुकरे आणि बिबीषण डुकरे दाम्पत्य नागरिकांना घरपोच भाजीपाला देत आहेत. या माध्यमातून काम नसलेल्या हातांना रोजगार मिळाला असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न
सुटला आहे.
उषा डुकरे यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. महिलांसाठी त्या विविध उपक्रम राबवतात. पनवेल तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कामोठ्यात सर्वाधिक रुग्ण वाढल्याने सार्यांचे लक्ष वेधले आहे. या बिकट परिस्थितीत नागरिकांना स्वस्त दरात ताजी भाजी घरपोच मिळावी या उद्देशाने डुकरे दाम्पत्याने सेक्टर 7मध्ये ग्रीनस्केप रॉयल बिल्डिंगमध्ये महालक्ष्मी स्वस्त भाजीविक्री केंद्र सुरू केले. जुन्नर परिसरातील शेतकर्यांकडून थेट भाजीपाला विकत घेतला जात असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला मिळतो.
दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने 3 ते 14 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या दिवसांत अत्यावश्यक वस्तूंच्या काऊंटर विक्रीला मज्जाव करण्यात आला असून घरपोच सेवा देण्याचे निर्देश देण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, परंतु महालक्ष्मी स्वस्त भाजीविक्री केंद्राद्वारे कामोठेकरांना घरपोच भाजीपाला मिळणार आहे. यासाठी 9029758187 आणि 9619361043 या क्रमांकावर ऑर्डर व्हॉट्सअॅप करण्याचे आवाहन एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.