पेण : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे व्हावे तसेच गावाचे नाव मोठे करावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी नुकतेच रावे (ता. पेण) येथे केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या रावे येथील सार्वजनिक माध्यमिक विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिके वितरण समारंभ नुकताच पार पडला. त्या वेळी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते ‘प्लास्टिक बंदी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात रविशेठ पाटील बोलत होते. रायगड जिल्ह्यात कोणीही काम केले नाही, एवढे काम आमदार रविशेठ पाटील यांनी केले असल्याचे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांनी सांगितले. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. रावे ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील, ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील, भाजप अध्यक्ष श्रीकांत पाटील, दादरचे मोहन नाईक, मुख्याध्यापक एस. आर. शेंगडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.