मिरचीचे दर स्थिर, महिलांची लगबग सुरू
पनवेल : बातमीदार : उन्हाच्या झळा आता बसण्यास सुरुवात झाली असून गृहिणींची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक चांगली असल्याने यंदा मात्र घाऊक बाजारात दर 10 रुपयांनी कमी आहेत, तर किरकोळ बाजारात स्थिर आहेत. गरम मसाल्यांमध्ये मात्र यंदा वेलची, खसखस याची दरवाढ झाली आहे.
महिला वर्षभराचा मसाला एकदाच करून ठेवतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लाल मिरची, गरम मसाले पदार्थ खरेदीची लगबग सुरू होते. मार्चपासून एपीएमसी मसाला बाजारात कर्नाटक, बंगळुरू, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात लाल मिरची दाखल होण्यास सुरुवात होते. 8 ते 10 गाड्यांवरून 20 गाड्यांची आवक झाली आहे, तसेच लाल मिरचीमधील पांडी, लवंगी, बेडगी, काश्मिरी, शंकेश्वरी यांची आवक होते. लवंगी, काश्मिरी, बेडगी, शंकेश्वरी मिरचीला महिला अधिक पसंती देतात.
मिरचीचे दर
या वर्षी किरकोळ बाजारात लवंगी मिरची 120 ते 130, बेडगी 140 ते 180, पांडी मिरची 120 आणि काश्मिरी मिरची 170 ते 180 रुपये किलो आहे. मागील वर्षी हे दर 30 रुपयांनी जास्त होते, तसेच गरम मसाल्यामध्ये लवंग 800 ते 1200 रु., धने 120 ते 200 रु., दालचिनी 250 ते 500 रु., काळीमिरी 400 ते 700 रु. आणि हळकुंड 150 ते 200 रुपये प्रतिकिलो भाव असून ते स्थिर आहेत.
वेलची, खसखस महागली
मसाला बनविण्यासाठी लाल मिरचीबरोबर लागणार्या काही गरम मसाल्यात दरवाढ झाल्याचे व्यापारी निखिल बोटे यांनी सांगितले. यामध्ये यंदा वेलची, खसखस याची दरवाढ झाली आहे. मसाला वेलची प्रतिकिलो 800 रुपयांना आहे. ती आधी 600 रुपये होती. हिरवी वेलची प्रतिकिलो 2 हजार 200 रुपये भाव आहे, ती आधी 1400 रुपये होती, तर खसखस आधी प्रतिकिलो 550 रुपये होती, ती आता 900 रुपये आहे.