खोपोली : प्रतिनिधी
पोलीस तपासाचा मुख्य भाग असलेले आरोपीच्या हाताचे बोट आता शाईमुक्त होणार असून पोलीस खातेदेखील स्मार्ट बनून अत्याधुनिक तंत्राचा वापर करत गुन्हेगारांचा माग घेणार आहे. रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांत ऑटोमेटेड
मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम (एम्बिस) ही संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील साडेसहा लाख आरोपींच्या बोटाचे ठसे जतन करण्यात आले आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील अडीच लाख आरोपींचे ठसे समाविष्ट आहेत. ही यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस ठाण्यात अटक होणार्या प्रत्येक आरोपीची बायोमेट्रिक माहिती एकत्रित जतन व्हावी, तसेच आरोपीला यापूर्वी कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक किंवा शिक्षा झाली आहे ही माहिती त्वरित उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे. या प्रणालीमध्ये बोटाचे ठसे, तळहाताचे ठसे, डोळ्यांची बुबूळ, डिजिटल प्रतिमा या महितीचा समावेश असणार आहे. या प्रणालीसाठी लागणारी उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पूर्वी आरोपींचे हाताचे ठसे हाताला शाई लावून घेतले जात असत. अनेक वेळा ओळख पटविण्यात यामध्ये अडचणी येत. यामुळे गृहविभागाने ही अद्ययावत यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात येणार्या पोलीस ठाण्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याचे मुख्य सर्व्हर अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात असेल.
शाई लावून पद्धतीत अनेक त्रुटी आणि वेळखाऊ होती. अनेकदा ठसे पुसट असायचे. ठसे घेतल्यानंतर पडताळणीसाठी पुणे येथे पाठवावे लागत. त्यानंतर गुन्हेगाराची ओळख पटणे यात बराच वेळ जायचा. नवीन यंत्रणेमुळे काही सेकंदातच गुन्हेगाराची ओळख पटण्यास मदत होणार असून आणखी कुठे गुन्हे असल्यास आरोपीची तत्काळ माहिती उपलब्ध होणार आहे.
-विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक, खालापूर