कर्जत : प्रतिनिधी
युनायटेड वे मुंबई ही संस्था कर्जत तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबवित आहे. या संस्थेने शुक्रवारी (दि.10) कर्जत शहरात कोविड लसीकरण जनजागृती रॅलीचे काढली होती.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक बळवंत घुमरे, युनायटेड वे च्या रायगड समन्वयक रेखा जाधव यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रहार अकॅडमी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोलीस मैदानावरुन निघालेली रॅली कर्जत शहरात फिरून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकामध्ये आली. त्या ठिकाणी सर्वांनी शपथ घेतली. मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी कोविड महामारी अजून गेली नाही, आपले लसीचे दोन्ही डोस झाले असले तरी मास्क लावणे, वारंवार हात धुणे गरजेचे आहे,तसेच सामाजिक अंतर पाळायचे आहे, असे सांगितले.
या रॅलीत नियमित हात धुवा, खोकला किंवा शिंकता तेव्हा आपला चेहरा झाकून घ्या, बाहेर जाताना नेहमीच मास्क घाला, सामाजिक अंतर कायम ठेवा आणि मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळा, आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्टरांना भेटा असे कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.