कर्जत : बातमीदार
नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनसाठी आणखी एक नवीन इंजीन नेरळ येथे दाखल झाले आहे. एनडीएम1 श्रेणीमधील 407 या क्रमांकाचे इंजीन नेरळ लोकोमध्ये पोहचले असून, या श्रेणीमधील मागील दोन वर्षांतील हे सलग आठवे इंजीन आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनविली आहेत. दरम्यान, माथेरानच्या राणीच्या सर्व इंजिनांना एकसारखी रंगसंगती असावी यासाठी जुन्या इंजिनांना नव्याने सजवण्यात येत आहे. नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या प्रवासात मागील काही दशकांत मोठे बदल झाले. सुरुवातीला वाफेवर चालणार्या इंजीनमधून आगीचे लोळ बाहेर पडून परिसरातील जंगलांचा मोठा र्हास होत होता. त्यामुळे नंतरच्या काळात मिनी ट्रेनची इंजिने डिझेलवर चालू लागली. मिनी ट्रेनच्या ताफ्यात ब्रिटिश काळानंतर एनडीएम 500 आणि 550 या श्रेणीमधील काही इंजिने आली. त्यातील पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञांनी बनविलेली पहिली इंजिने म्हणून एनडीएम1 श्रेणीमधील 400पासून सीरियल सुरू होते. ती इंजिने 2016पासून येण्यास सुरू झाली, मात्र आजही एनडीएम 550 श्रेणीमधील इंजिने मिनी ट्रेनच्या ताफ्यात आहेत. मुंबई कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या कार्यशाळेत बनलेली एनडीएम1 या श्रेणीमधील 400, 401, 402, 403 या चार इंजिनांनंतर 22 नोव्हेंबर 2018 रोजी एनडीएम1 404 हे पाचवे इंजीन दाखल झाले होते. 405 आणि 406 या नामावलीतील सहावे आणि सातवे इंजीन डिसेंबर 2018मध्ये नेरळ लोकोत पोहचले होते. आता एनडीएएम1 407 हे आठवे इंजीन या महिन्यात नेरळला पोहचले आहे. या सर्व इंजिनांची बांधणी भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी केली आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या भावी काळातील पर्यटन हंगामासाठी नवीन इंजिने सुचिन्हे समजली जात आहेत. तब्बल आठ नवीन इंजिने मिनी ट्रेनच्या ताफ्यात आल्याने आगामी पर्यटन हंगामासाठी मध्य रेल्वे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 2006मध्ये नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या ताफ्यात आलेल्या दोन इंजिनांना नवा साज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनडीएम 551 हे इंजीन मिनी ट्रेनच्या ताफ्यातील यशस्वी इंजीन असून, त्या इंजिनांना नव्याने जांभळा व पिवळा रंग देऊन मिनी ट्रेनच्या ताफ्यातील सर्व इंजीन एकसारखी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. एनडीएम 551 या इंजिनाला नवीन रंगसंगती देऊन मुंबई कुर्ला येथील कार्यशाळेतून शनिवारी (दि. 23) नेरळ येथे आणले आहे.